मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅबमुळे आरोग्य सेवेत नवी क्रांती ; नागरिकांना जलद, अचूक आणि विश्वासार्ह निदान सुविधा पालकमंत्री प्रताप सरनाईक
पीसीआर मॉलिक्युलर व स्किल लॅबचे उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क 
धाराशिव : ‘मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅब’ सारख्या अत्याधुनिक सुविधांविषयी बोलताना अत्यंत आनंद होत आहे.आरोग्य क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झालेली प्रगती ही आपल्या समाजासाठी मोठी देणगी आहे.आजच्या काळात आजारांचे निदान जितके लवकर आणि अचूक होईल,तितके उपचार अधिक प्रभावी होतात.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
आज १ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या पीसीआर मॉड्युलर लॅब व स्किल लॅबचे उद्घाटन पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मंचावर मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, मॉलिक्युलर लॅबमध्ये DNA, RNA आणि जनुकीय स्तरावर तपासण्या केल्या जात असल्यामुळे आजारांचे निदान जलद, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने करता येते.कोविड-१९, क्षयरोग (TB), एचआयव्ही, हिपॅटायटिस यांसारख्या गंभीर आजारांचे वेळेत निदान होणे अत्यंत गरजेचे असून ही सुविधा ते शक्य करून देते.या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकाच वेळी अनेक जंतू आणि विषाणूंची ओळख पटवता येते.एका पॅनेलमध्ये २५ ते १०० पर्यंत सूक्ष्मजंतू शोधण्याची क्षमता ही या प्रणालीची ताकद आहे.त्यामुळे रुग्णाला नेमका कोणता संसर्ग झाला आहे,हे त्वरीत समजते आणि योग्य उपचार देणे शक्य होते.असे श्री.सरनाईक यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, मल्टिप्लेक्स PCR पॅनेलच्या माध्यमातून श्वसन संक्रमण,जठरांत्र संक्रमण, मेंदूज्वर, सेप्सिस, ट्रॉपिकल फीव्हर यांसारख्या विविध आजारांचे एकाच वेळी परीक्षण करता येते असे सांगून श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,ही सुविधा आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि परिणामकारक बनवते.तसेच, अँटिबायोटिक प्रतिकार तपासणी ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज ठरत आहे.mecA, NDM, KPC यांसारख्या जनुकांची तपासणी करून औषधांना प्रतिकार करणारे जंतू ओळखता येतात.यामुळे डॉक्टरांना योग्य औषधोपचार निवडता येतात आणि रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होते.असे सरनाईक यावेळी म्हणाले.
सरनाईक पुढे म्हणाले की,आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ४० पेक्षा अधिक तपासण्या एका प्लॅटफॉर्मवर करता येत असल्याने ही केवळ वैद्यकीय प्रगती नसून समाजाच्या आरोग्य सुरक्षेची हमी बनली आहे.अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता आणि गती दोन्ही वाढणार आहेत.सरकारच्या वतीने आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.नागरिकांना दर्जेदार, जलद आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आरोग्य सेवा अधिक व्यापक,सक्षम आणि परिणामकारक करण्याचा आमचा संकल्प असून प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील राहील,असेही पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले,या लॅबच्या माध्यमातून आजाराचे अचूक निदान होण्यास मदत होणार आहे. मोठी गुंतवणूक या लॅबसाठी झाली आहे. त्याचा परिपूर्ण उपयोग जिल्ह्यातील रुग्णांच्या आजारावरील निदानासाठी झाला पाहिजे.वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची अडचण आहे,त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.चौदाशे ते पंधराशे बेड इथे उपलब्ध होणार आहे.त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई येथे बैठक घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून माहिती देताना अधिष्ठाता डॉ.चौहान म्हणाले की,जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ही लॅब रुग्ण सेवेच्या दृष्टीतून महत्त्वाची ठरणार आहे. कोविडसारख्या १०० हजाराचे निदान या मॉलिक्युलर लॅबच्या माध्यमातून होणार आहे.वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी या प्रयोगशाळेचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे फीत कापून प्रयोगशाळेचे उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान उपस्थित होते. कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





