खरेदीदार-विक्रेता संमेलनातून ९८३ कोटींचे ६४ सामंजस्य करार , शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्थिर बाजारपेठेची नवी संधी
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत व पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय खरेदीदार-विक्रेता २०२६ संमेलनात फळे, भाजीपाला व धान्य या उत्पादनांसाठी एकूण १,७९,६६१ मेट्रिक टन क्षमतेचे व सुमारे ९८३ कोटी रुपयांच्या व्यवहारमूल्याचे ६४ सामंजस्य करार करण्यात आले.
शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्थात्मक खरेदीदार यांच्यात थेट बाजारजोडणी निर्माण करून शेतमालाला स्थिर, पारदर्शक व दीर्घकालीन बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
स्मार्ट प्रकल्पाचे विभागीय अंमलबजावणी कक्ष प्रमुख तथा विभागीय कृषि सहसंचालक सुनील वानखेडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी विभागीय नोडल अधिकारी श्रीमती माधुरी सोनवणे, जिल्हा नोडल अधिकारी अनिल साळुंखे (छत्रपती संभाजीनगर) व बाळासाहेब नितनवरे (बीड), तसेच पॅलेडियमचे प्रतिनिधी प्रसाद नळे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात श्रीमती माधुरी सोनवणे यांनी स्मार्ट प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाजारजोडणी उपक्रमांचा आढावा घेत शेतकरी उत्पादक संस्थांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करारांची आवश्यकता अधोरेखित केली.
सुनील वानखेडे यांनी स्मार्ट प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून शेतकरी उत्पादक संस्थांना ६० टक्क्यांपर्यंत अनुदानाची तरतूद असल्याचे नमूद केले. खरेदीदारांच्या अपेक्षांनुसार उत्पादन व पुरवठा केल्यास संस्थांची विश्वासार्हता वाढून दीर्घकालीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनाची गुणवत्ता व स्पर्धात्मकता वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
संमेलनात गुणवत्ता मानके, दर निश्चिती, सातत्यपूर्ण पुरवठा, हमी व्यवस्था, पेमेंट धोरण, उत्पादन क्षमता, उपलब्धता, स्पर्धात्मक दर तसेच वितरण साखळी या महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेमुळे खरेदीदार व विक्रेते यांच्यात विश्वास व पारदर्शकतेवर आधारित दीर्घकालीन व्यावसायिक संबंधांची भक्कम पायाभरणी झाली. यावेळी खरेदीदार संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या खरेदी निकष, लॉजिस्टिक्स व कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करत बाजारपेठेतील संधी व ग्राहकांच्या अपेक्षांची स्पष्ट मांडणी केली. यामुळे शेतकरी उत्पादक संस्थांना पुढील वाटचालीसाठी ठोस दिशा मिळाली.
या संमेलनात एकूण ७१ शेतकरी उत्पादक कंपन्या व ३८ खरेदीदार (प्रत्यक्ष व ऑनलाईन) सहभागी झाले होते. या संवादातून शेतकरी उत्पादक संस्था व खरेदीदार यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होऊन भविष्यातील व्यावसायिक व्यवहारांसाठी सकारात्मक व विश्वासार्ह वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, फळे, भाजीपाला व धान्य या उत्पादनांसाठी एकूण १,७९,६६१ मेट्रिक टन क्षमतेचे व सुमारे ९८३ कोटी रुपयांच्या व्यवहारमूल्याचे ६४ सामंजस्य करार (MoU) करण्यात आले, ही या संमेलनाची उल्लेखनीय कामगिरी ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि अधिकारी श्रीमती श्रुतीजा वीर व श्रीमती ज्योती भुते यांनी केले. सनियंत्रण, मूल्यमापन तज्ञ अधिकारी चंद्रशेखर भोगे यांनी आभार मानले.





