अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा; नुकसानभरपाईची मागणी — प्रणिती शिंदे
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून याचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसांपासून मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. तसेच पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागानेही अशाच परिस्थितीचा इशारा दिला आहे.
या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर द्राक्ष काढणी सुरू असताना शेतकऱ्यांना फटका बसत असून डाळिंब, केळी, कांदा व दोडका या पिकांनाही गारपिटीचा मोठा फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे.





