बार्शीत उडान फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम : 550 कुटुंबांना ईद साहित्य किट, 105 मुलांना कपड्यांचे वाटप
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : उडान फाउंडेशनच्या वतीने बार्शी शहर व तालुक्यातील गरजू कुटुंबांसाठी एक कौतुकास्पद सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रमजान ईदनिमित्त 550 गरजू, गरीब व विधवा महिलांना ईद-उल-फितरसाठी आवश्यक साहित्याचे किट तसेच 105 गरजू मुला-मुलींना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम मालवंडी, गुळपोळी, तांदुळवाडी, कारी पांगरी, उपळे (दु), घाणेगाव, उंडेगाव, गाडेगाव, घारी आदी ग्रामीण भागांसह बार्शी शहरातील विविध परिसरात पार पडला. वितरित करण्यात आलेल्या किटमध्ये काजू, बदाम, चारोळी, वेलची, मनुके, शेवया, खजूर, तेल पाकीट, गूळ, डालडा यांसारख्या वस्तूंचा समावेश होता.
श्रीमंत-गरीब, मालक-नोकर असा कोणताही भेद न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन आनंदाने ईद साजरी करता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. गेल्या 13 वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांची निवड गरजू, गरीब, विधवा, अपंग अशा निकषांवर करण्यात आली. विभागातील सदस्यांमार्फत निवड करून त्यांना कुपन वितरित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित लाभार्थ्यांचे स्वागत करून त्यांना साहित्य किट देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. मौलाना शेख यांची उपस्थिती लाभली. त्यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. उडान फाउंडेशन गेल्या 13 वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. रमजान महिन्यातील हा उपक्रम विशेष ठरतो. याशिवाय रक्तदान शिबिरे, माफक दरात रुग्णवाहिका सेवा, लॉकडाऊन काळात 3500 किराणा किटचे वाटप, लग्न व वैद्यकीय मदत, विविध सामाजिक सन्मान सोहळे, व्याख्याने आदी उपक्रमही यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.
बार्शीतील सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांनी स्थापन केलेले उडान फाउंडेशन आज सामाजिक कार्यात अग्रेसर ठरत असून, गरजूंच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असते. समाजहितासाठी एकत्र येऊन काम करण्याची त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख, कार्याध्यक्ष शकील मुलाणी, सचिव जमील खान, सहसचिव अख्तर शेख तसेच मोहसीन पठाण, साजन शेख, राजू शिकलकर, तोसिफ बागवान, मुदस्सर सय्यद, सादिक काझी, रियाज बागवान, अकिल मुजावर, अल्ताफ शेख, इंजि. एजाज शेख, मोईन नाईकवाडी, अॅड. रियाज शेख, मुन्ना बागवान, जावेद शेख, सलीम शेख, युवा अध्यक्ष सलमान बागवान, साहिल मुजावर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आणि आनंद हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.





