“नोकरीची वाट नाही… उद्योगाची वाटचाल! बी. पी. सुलाखे कॉलेजमध्ये प्रेरणादायी समारोप”

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे एक आठवड्याच्या उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचा समारोप दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या शिबिरातून विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दृष्टी, आत्मविश्वास आणि व्यवहारकुशलतेची प्रभावी शिकवण मिळाली.

या समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीतील प्रसिद्ध उद्योजक विनयजी संघवी उपस्थित होते. तसेच बार्शीतील पहिले मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तुद यांची विशेष उपस्थिती होती , तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी पाटील हे होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे हे ही उपस्थित होते.

या एक आठवड्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रे व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. उद्योजकता व व्यवसाय कायदा, व्यवसाय नियोजन, मार्केटिंग कौशल्य, आर्थिक व्यवस्थापन, स्टार्टअप संकल्पना, संवादकौशल्य, तणाव व्यवस्थापन व नेतृत्व विकास अशा विविध विषयांचा सखोल उहापोह करण्यात आला. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक नव्हे तर व्यवहारातील उदाहरणांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे विनयजी संघवी यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून उद्योगविश्वातील संघर्ष, अपयश आणि यशाचा प्रवास उलगडत विद्यार्थ्यांना धाडस, सातत्य आणि नवकल्पनाशक्ती या तीन गुणांचे महत्त्व पटवून दिले. “उद्योजक हा संधीची वाट पाहत नाही, तर संधी निर्माण करतो,” असा संदेश त्यांनी दिला.

डॉ. कृष्णा मस्तूद यांनी मानसिक सुदृढता, सकारात्मक दृष्टीकोन आणि तणाव व्यवस्थापन याविषयी हसत-खेळत शैलीत मार्गदर्शन केले. उद्योजकतेत मानसिक स्थैर्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्याचे सूत्र दिले. अध्यक्षीय भाषणात पी. टी. पाटील यांनी मूल्याधिष्ठित उद्योजकता, सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःपुरते यश न पाहता समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.50000

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले. एक आठवड्याच्या कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. बी. डी. लांडे यांनी सादर केला. प्रमुख पाहुणे विनयजी संघवी यांचा परिचय विभागप्रमुख प्रा. के. बी. चपटे यांनी करून दिला, तर डॉ. कृष्णा मस्तूद यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. ए. ढगे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम. भाग ३ मधील विद्यार्थी यश रणसुभे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रा. के. एम. माळी यांनी केले.

संपूर्ण शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विविध उपक्रम, चर्चासत्रे, प्रश्नोत्तरे आणि प्रेरणादायी संवादातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची नवी उमेद निर्माण झाली. या प्रेरणादायी समारोप सोहळ्याने महाविद्यालयाच्या कौशल्यविकास उपक्रमांना नवी दिशा दिली असून, भविष्यातील उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, महाविद्यायामधील शिक्षक, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब पाटील व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या