ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार घटस्फोटीत सुनेच्या ताब्यातील घरजागा सासू – सासऱ्यांच्या ताब्यात देण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे आदेश
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : बार्शी येथील रहिवासी लता अनिल शिंदे व पती अनिल गुरुनाथ शिंदे या ज्येष्ठ नागरिक दांपत्याने त्यांचे स्वकष्टार्जित मालकीचे बिनशेती जमीन गट नं-१३४०/२ अ पैकी प्लॉट नं-३० या टू-बीएचके बांधकामासह घरजागा घटस्फोटीत सुनेच्या बेकायदीशरपणे ताब्यातून राहण्यास मिळणेकरिता उपविभागीय अधिकारी प्रांतसाहेब यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम-२००७ मधील कलम-५ अन्वये अर्ज दाखल केला होता.
सदर अर्जावर न्यायिक चौकशी होवून प्रांतसाहेब यांनी दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिक दांपत्यास सुनेच्या बेकायदेशीरपणे ताब्यात असलेल्या घराचा ताबा देण्याबाबतचे आदेश झाले होते.या आदेशाच्या विरोधात सुनेने आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ च्या कलम-१६(१) अन्वये सासू-सासर्यांच्या विरोधात मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या न्यायालयात स्थगिती अर्जासह अपील दाखल केले होते.
यावेळी सदरच्या अपिलाच्या विरोधात सामनेवाला ज्येष्ठ नागरिक लता शिंदे व अनिल शिंदे यांच्यातर्फे अॅड.विवेक गजशिव यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात लेखी व तोंडी युक्तिवादाद्वारे योग्य ती बाजू मांडल्यामुळे जेष्ठ नागरिक असलेल्या सासू व सासऱ्यास सुनेकडून घर जागेचा ताबा देण्याचे आदेश मा.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देऊन उपविभागीय अधिकारी प्रांत यांचा आदेश कायम ठेवलेला आहे. यावेळी ज्येष्ठ-नागरिक सामनेवाला यांच्यावतीने अॅड. विवेक गजशिव,अॅड. श्रीराम काशिद यांनी काम पाहिले.




