उसाला प्रति टन किमान ₹३५०० पहिला हफ्ता मिळावा; दरवाढीसाठी सरकारने तत्काळ हस्तक्षेप करावा
खासदार प्रणिती शिंदे यांची लोकसभेत जोरदार मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील शून्य प्रहरामध्ये सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न ठामपणे मांडत केंद्र सरकारकडे तातडी हस्तक्षेपाची मागणी केली. पंढरपूर-वाखरी येथे गेल्या पाच दिवसांपासून ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
सोलापूर जिल्ह्याबाहेरील साखर कारखाने ₹३२०० ते ₹३५०० प्रति टन दर जाहीर करत असताना, सोलापूर जिल्ह्यातील कारखाने केवळ ₹२८०० प्रति टन दर देत आहेत. प्रचंड महागाई, खत व औषधांचे वाढते दर आणि एका खताच्या पोत्याची ₹२००० पर्यंत वाढलेली किंमत यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक चक्रव्यूहात अडकले असून कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.
उसाला पहिला हफ्ता किमान ₹३५०० प्रति टन मिळावा, गाईच्या दुधाला ₹५०, तर म्हशीच्या दुधाला ₹८० प्रति लिटर दर मिळावा, अशी ठोस मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारसमोर ठेवली. तसेच ऊस आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करत त्यांनी सरकारने शेतकरीहिताचे निर्णय घ्यावेत, असे सांगितले.




