“सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवा सुलभ करणे ही काळाची गरज : आमदार सुभाष देशमुख
जुळे सोलापूर येथे मोफत ‘लोकमंगल संजीवनी मेडिकल’चे उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील मोठा आधार ठरणाऱ्या मोफत ‘लोकमंगल संजीवनी मेडिकलचा भव्य शुभारंभ आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. “सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. समाजाच्या हितासाठी लोकमंगल परिवाराकडून उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
टाकळीकर मंगल कार्यालयाजवळ सुरू झालेल्या या मोफत मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, वस्तू सेवाकर व सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक महेश देशमुख, डॉ. वैशंपायन स्मृती शा.वै.म.चे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, श्री. छ. शिवाजी सर्वोपचार रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. अग्रजा वारेकर-चिटणीस, प्रवचनकार डॉ . जयंत करंदीकर, तसेच लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांचा समावेश होता.
यावेळी या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल टाकळीकर दांपत्यांचा आमदार सुभाष देशमुख यांनी सत्कार केला या कार्यक्रमाच्या शेवटी अनेक दानशूर व्यक्तींनी या उपक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमाद्वारे गरजू व सामान्य नागरिकांना औषधे आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहेत. लोकमंगल परिवाराने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या या पुढाकाराचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमास लोकमंगलचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोफत मेडिकल सुरू झाल्याने नागरिकांना आता वैद्यकीय मदतीचा एक विश्वासार्ह व मोफत पर्याय उपलब्ध झाला आहे.




