अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती द्या – जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील यांचे निर्देश
B1न्यूज मराठी नेटवर्क
नागपूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उप समितीचे अध्यक्ष डॉ.राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिले.
नागपूर विधानभवनात महामंडळाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार ॲड. राहुल कुल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव गणेश पाटील, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख तसेच वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे उपस्थित होते.
यावेळी मंत्री विखे – पाटील यांनी महामंडळाच्या योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा व्यापक प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा आणि विभाग स्तरावर मेळावे, शिबिरे आणि माहितीपर उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात यावा. यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती सहज पोहोचण्यास मदत होईल. तसेच, महामंडळाचे संकेतस्थळ (Website) सुरळीत करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.




