सोलापूरसह महाराष्ट्रातील, बिडी कामगार महिलांच्या रोजगारासाठी पर्यायी उपाययोजना करा — प्रणिती शिंदे यांची लोकसभेत केंद्र सरकारकडे जोरदार मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी दिल्ली | ८ डिसेंबर २०२५ : सोलापूरसह महाराष्ट्रातील महिला बीडी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा मुद्दा आज संसदेत ठळकपणे ऐरणीवर आला. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या महिलांच्या रोजगार, आरोग्य आणि भविष्याच्या सुरक्षेचा निर्णायक प्रश्न केंद्र सरकारच्या समोर जोरदारपणे मांडला.
सोलापूर जिल्ह्यासह परिसरात जवळपास एक लाख महिला बीडी उद्योगाशी जोडलेल्या आहेत. पर्यायी रोजगाराच्या कमतरतेमुळे आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या या उद्योगावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचे वास्तव खासदार प्रणिती शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
बीडी उद्योगावर निर्बंध किंवा बंदी घालण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्यास, त्याचा सर्वाधिक फटका या महिलांच्या उदरनिर्वाहावर बसणार असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महिलांना बेरोजगार होण्यापासून वाचवण्यासाठी पुनर्वसन योजना, ठोस कल्याणकारी उपाय आणि पर्यायी रोजगारनिर्मितीची तयारी सरकारकडे आहे का—याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट प्रश्न विचारला.
धोरण बदलाचा विचार करत असाल, तर आधी महिलांचे भविष्य सुरक्षित करण्याची हमी द्या, असे ठाम शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले. बीडी कामगार महिलांचे आर्थिक व सामाजिक संरक्षण सुनिश्चित करणारे सर्वंकष धोरण तातडीने जाहीर करण्याची मागणीही खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केली.




