प्रवर अधीक्षक डाकघर सोलापूर यांच्या कार्यालयात 9 डिसेंबर रोजी डाक अदालत होणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर दि. 04 : देशातील पोस्ट सेवा ही सामाजिक-आर्थिक जीवनाचा अभिन्न भाग असून नागरिकांच्या मनामध्ये पोस्ट विभागाने एक विशेष स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्याच्या प्रयत्नात काहीवेळा त्रुटी निर्माण होतात व त्याबाबत तक्रारी नोंदवल्या जातात. अशा तक्रारींचा न्यायनिवाडा करण्यासाठी पोस्ट विभागामार्फत वेळोवेळी डाक अदालतीचे आयोजन केले जाते.
प्रवर अधीक्षक डाक कार्यालय, सोलापूर विभाग (सोलापूर हेड पोस्ट ऑफिस पाठीमागे) यांच्या वतीने दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 11.30 वा. प्रवर अधीक्षक डाकघर सोलापूर यांच्या कार्यालयात 121 वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
तक्रारींचा विचार :
सहा आठवड्यांच्या आत निवारण न झालेल्या व समाधानकारक उत्तर न मिळालेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल.
विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर यासंबंधी तक्रारी विचारात घेतल्या जातील.
तक्रारींमध्ये सर्व तपशील नमूद करणे आवश्यक आहे, जसे की तक्रार पाठविल्याची तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पद.
तक्रार सादरीकरण :
संबंधितांनी आपली तक्रार दोन प्रतींसह हेमंत खडकेकर, प्रवर अधीक्षक डाकघर, सोलापूर विभागीय कार्यालय, सोलापूर – 413001 यांच्या नावे दिनांक 06 डिसेंबर 2025 पर्यंत पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर, सोलापूर यांनी दिली आहे.




