सक्षम ताटे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत वंचित लढा देईल – अंजलीताई आंबेडकर
नांदेडमध्ये अंजलीताई आंबेडकरांकडून ताटे कुटुंबियांचे सांत्वन
B1न्यूज मराठी नेटवर्क
नांदेड : आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडी ताटे कुटुंबियांसोबत असेल, अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी दिली. नांदेड येथे जाऊन प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी ताटे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
आचल नावाच्या तरुणीसोबत सक्षमचे आंतरजातीय प्रेमसंबंध होते. या नात्याला तिच्या कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे सक्षमची निर्घृण हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आचलने दोन व्हिडिओंद्वारे घटनांची माहिती देत आपल्या कुटुंबाकडून झालेल्या दबावाचे आणि पोलिसांकडून घडवून आणलेल्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.
आचलच्या म्हणण्यानुसार, तिच्या अल्पवयीन काळात सक्षमवर जबरदस्तीने पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु १८ वर्षांची झाल्यानंतर तिनेच तो गुन्हा खोटा असल्याचे सांगितले. हत्येच्या दिवशीही तिच्यावर तक्रार देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. इतकेच नव्हे तर पोलिसांनीच तिच्या भावाला “त्या मुलाला मार” असा सल्ला दिल्याचे आचलने व्हिडिओत नमूद केले आहे.
या घटनेनंतर पीडितेवरच दोषारोप लादण्याची प्रवृत्ती थांबवणे अत्यावश्यक असल्याचे अंजलीताई आंबेडकर यांनी नमूद केले. नांदेड पोलिसांनी नि:पक्षपाती तपास करून सक्षम ताटे यांना न्याय मिळवून द्यावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. अक्षय भालेराव प्रकरणातील चुका पुन्हा होऊ नयेत, अशीही त्यांनी आठवण करून दिली.
सक्षमचे कुटुंब आणि आचल दहशतीत असल्याने त्यांना त्वरित सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही त्यांनी केली. आरोपी अल्पवयीन असल्याने तो लवकर सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो सुटल्यावर बाहेर येऊन पुन्हा गुन्हा करण्याची भीती नागरिकांमध्ये असल्याने आंचल आणि ताटे कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनीही आचलच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले असून, पीडित कुटुंबीयांच्या लढ्यात ठामपणे सोबत राहण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आणि संविधानाचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना या देशातील मनुवादी संस्कृती अजूनही जिवंत आहे. त्यामुळे मुलीला स्वतःचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य न देणं, तिच्यावर निर्णय लादणे जाणे आणि आंतरजातीय प्रेम, विवाह यांना स्वीकारले न जाणे, यातून हिंसा घडवण्याची ही मनुवादी वृत्ती आहे.
आंचलच्या शिक्षणाची वंचितने घेतली जबाबदारी
अंजलीताई आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, सक्षम ताटे यांना न्याय मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने लढा देत राहणार आहे. तसेच आचलच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारीही पक्ष उचलणार असल्याची घोषणा त्यांनी केली.




