दिव्यांग दिनानिमित्त मनपातर्फे विशेष फिजिओथेरपी शिबिर
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेतर्फे बुधवार, ३ डिसेंबर रोजी विशेष फिजिओथेरपी सेवा व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे ठिकाण महापालिका भौतिकोपचार केंद्र, जोडबसवण्णा चौक, मनपा शाळा क्र. ६ (सुधीर गॅस एजन्सीमागे) असून, सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत सेवा उपलब्ध राहणार आहेत.
या शिबिरात दिव्यांग बांधवांसाठी फिजिओथेरपी तज्ञांकडून संपूर्ण वैद्यकीय तपासणी, शारीरिक स्थितीचे मूल्यमापन, आवश्यक उपचार पद्धतींचे मार्गदर्शन, वेदनानियंत्रण, पुनर्वसन, तसेच हालचाल सुधारण्यासाठी उपाययोजना दिल्या जाणार आहेत. विशेषतः हालचालीतील अडथळे, स्नायू कमजोरी, सेरेब्रल पाल्सी, पक्षाघात आणि जन्मजात अडचणी असलेल्या लाभार्थ्यांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
दिव्यांग व्यक्ती अधिक सक्षम, स्वावलंबी व सक्रिय जीवनाकडे वाटचाल करतील, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. शिबिरासाठी अनुभवी फिजिओथेरपिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार असून हा उपक्रम मनपा आरोग्य विभाग व दिव्यांग कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. सोलापूर शहरातील सर्व दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.




