औषधांच्या अभावी जीव गेलेल्या मित्राच्या वेदनेतून जन्मला मोफत औषध वाटपाचा निर्णय

0

Screenshot

गरिबांच्या जीवाला दिलासा देणारा लोकमंगलचा नवा उपक्रम…!

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : मोफत अन्नपूर्णा योजना, सामुदायिक विवाह सोहळे अशा अनेक सामाजिक उपक्रमांनंतर लोकमंगल फाउंडेशनकडून सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी अत्यंत संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा उपक्रम सुरू केला जात आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरीब, ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी रुग्णालयातून औषधे न मिळालेल्या रुग्णांना मोफत औषध व गोळ्या वाटप करण्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी केली. या उपक्रमाची सुरुवात १२ डिसेंबरपासून होणार आहे.

एका हृदयस्पर्शी प्रसंगाची आठवण सांगताना आमदार सुभाष देशमुख भावूक होत म्हणाले,
“माझा एक जिवलग मित्र केवळ औषधे मिळाली नाहीत म्हणून जीव गमावून बसला. अशा वेदनादायी घटना पुन्हा घडू नयेत, कोणाचंही घर उजाडू नये, म्हणून हा उपक्रम सुरु करण्याचा संकल्प केला आहे.”

या उपक्रमांतर्गत –
• सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे गरजू रुग्ण
• सरकारी रुग्णालयातून औषधे उपलब्ध न झालेल्या व्यक्ती
• गरीब व ज्येष्ठ नागरिक
• उपचारासाठी असमर्थ रुग्ण
या सर्वांना आवश्यक औषधे मोफत दिली जाणार आहेत.

१२ डिसेंबरला या योजनेचा प्राथमिक शुभारंभ होणार असून पुढील काळात हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणावर व सर्वसमावेशक स्वरूपात राबविण्याचा मानस असल्याचे आमदार देशमुख यांनी स्पष्ट केले.

शहर व जिल्ह्यातील समाजसेवी संस्था आणि संघटनांनी या उपक्रमात सामील व्हावे, जेणेकरून “कोणताही रुग्ण औषधांच्या अभावी अडचणीत येऊ नये,” असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. गरिबांच्या आरोग्यासाठी उभे राहणारा लोकमंगलचा हा उपक्रम समाजाला आश्वस्त करणारा आणि जीवन वाचवणारा ठरणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या