‘पुणे ग्रँड चॅलेज टूर’ सायकलिंग स्पर्धेकरिता सर्व सुविधांसह सुरक्षेचे काटेकोर व्यवस्थापन करा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : ‘पुणे ग्रँड चॅलेज टूर’ सायकलिंग स्पर्धेकरिता रस्ते विकास, वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, स्पर्धा मार्गावरील सुरक्षा आदी आदी बाबींचे काटेकोर व्यवस्थापन करावे, सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (सीएफआय) मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालय येथे ‘पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता आर. एस. रहाणे, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, पिंपरी चिंचवड वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. प्रशांत वडेकर आदी उपस्थित होते.

‘पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेसाठीच्या रस्त्यांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन डॉ. पुलकुंडवार म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग, दोन्ही महानगरपालिका तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,सीएफआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रस्त्यांचे काम करावे. दरवर्षी स्पर्धा होणार असल्याने होणारे रस्ते अत्यंत टिकाऊ व्हावेत. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होता कामा नये. पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी. योग्य ते मार्गदर्शक फलक, पर्यटन स्थळांचे फलक (सायनेजेस) करण्यासह… स्पर्धेला अडथळा ठरतील असे जाहिरात फलक (होर्डिंग्ज) काढावेत. सर्व यंत्रणांनी स्पर्धा संपेपर्यंत रस्त्याची नियमित तपासणी करावी, असेही ते म्हणाले.

स्पर्धा मार्गावर भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. मार्गावरील गावात पाळीव जनावरांना स्पर्धा कालावधीत रस्त्यावर येऊ देऊ नयेत यासाठी जनजागृती करावी. स्पर्धा कालावधीत मार्गावर कोणत्याही प्रकारची वाहतूक येणार नाही. यासाठी वाहतूक वळविण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. मार्गावर केबल टिव्ही वायर्स, वीजेच्या वाहिन्या आदींचा कोणताही अडथळा असणार नाही याची खात्री करावी. वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीसांनी आवश्यक ते मनुष्यबळ नेमावे, गरजेप्रमाणे अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था करावी. मनुष्यबळाला प्रशिक्षण द्यावे. एनसीसी तसेच होमगार्डची सेवा घ्यावी. मार्गावरील गावातील स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या युवकांची सेवा घ्यावी. मार्गावर संपर्क व्यवस्था कार्यरत रहावी यासाठी सर्व तांत्रिक बाबी तपासून यंत्रणा उभारावी, आदी सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी स्पर्धेचे क्रीडा वाहिनीवरून थेट प्रक्षेपण होणार असल्याचे सांगितले. यंत्रणांना आवश्यक ते साधनसामुग्रीसाठी निधी पुरविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनीही मार्गावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस विभागाकडून स्पर्धा मार्गावर करावयाचे बॅरिकेटींग, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक वळविणे आदींविषयी माहिती देण्यात आली.

आरोग्य विभागाकडून स्पर्धेसाठी व्यवस्था करण्यात आलेल्या बाईक ॲम्ब्युलन्स, ॲम्ब्युलन्स आदी सुविधांची माहिती देण्यात आली.यासाठी खाजगी रुग्णालयांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. स्पर्धकांच्या आवश्यक त्या उपचारांसाठी रूग्णालयांचे नियोजन, खासगी विशेषोपचार रुग्णालयांचा रुग्णसेवेसाठी, रुग्णवाहिका पुरविण्यासाठी सहयोग आदी माहिती देण्यात आली.

बैठकीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (रस्ते) अनिरुद्ध पावसकर यांच्यासह परिवहन, आरोग्य, पोलीस आदी विभागांचे अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड येथील सायकलिंग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या