बार्शी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केली प्रतिबंधक कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५ शांततेने पार पडावी त्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये त्या अनुषंगाने ज्यांच्यावर शरीराविरुध्द गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर बार्शी शहर पोलीस ठाणेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
बार्शी शहर पोलीस ठाणे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम प्रमाणे १२, महाराष्ट्र दारूबंदी अधिनिय प्रमाणे २१ केसेस करण्यात आल्या आहेत. तसेच जे सतत दारू विकतात त्यांच्याकडून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ९३ प्रमाणे २० जणांकडून मा. उपविभागीय दंडाधिकारी यांचे समक्ष अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे.
मा. जिल्हाधिकारी सो, पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशान्वये शहरातील मागील पाच वर्षात ज्यांच्यावर शरीराविरूध्द गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर बी.एन.एस.एस. कलम १२६ प्रमाणे ४५३, बी.एन.एस.एस. कलम १२९ प्रमाणे १५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर यांनी बार्शीतील १) युन्नुस रज्जाक सय्यद रा. मांगडे चाळ. २) अक्षय पप्पू भवळ रा. लहुजी चौक, बार्शी ३) ओंकार उर्फ तुळया किशन पेठाडे रा. टिळक चौक ४) राजेंद्र भगवान गायकवाड, रा. १६९० लहुजी चौक, बार्शी. यांना पुढील सहा महिन्याकरीता सोलापूर व धाराशिव जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे.
तसेच मतदान शांततेत पार पडावे म्हणून शहरातील ४७ जणांना दि. २८/११/२०२५ ते दि. ०३/१२/२०२५ रोजी पर्यंत ०६ दिवसासाठी बार्शी शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी वरील सर्व हद्दपार इसमाना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
तरी बार्शी शहरातील सर्व नागरिकांनी निवडणुकच्या दरम्यान भांडण तंटा करू नये. मतदान प्रक्रिया शांततेने पार पाडावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये. असे प्रशासना तर्फे आवाहन करण्यात येत आहे.




