तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील अनेक तरुणांची लाखो रुपये घेऊन रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(3), 340(1), 341(1), 342, 204, 335 या कलमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास अधिकारी यांनी तपास पूर्ण करून दोषारोप बार्शी न्यायालयात दाखल केले.
पांगरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी बार्शी येथील खाजगी बँकेमध्ये डेप्युटी मॅनेजर या पदावर काम करत असून त्याची तोंड ओळख असलेला समाधान बालाजी वट्टमवार राहणार सुभाष नगर बार्शी याने रेल्वेत नोकरीला आहे, असे सांगून फिर्यादीस देखील रेल्वेत नोकरी लावतो असे म्हणून त्यास विश्वासात घेऊन, तुला रेल्वेमध्ये सुरक्षा ठेव म्हणून सात हजार रुपये भरावे लागतील असे सांगून फिर्यादी कडून पैसे घेतले व फिर्यादीस रेल्वेचा शिक्का असलेली पावती त्याने दिली. त्यामुळे फिर्यादीचा आरोपीवर विश्वास बसला तसेच आरोपी वारंवार आणखी रक्कम घेत गेला. फिर्यादीची कुर्डूवाडी येथे ज्युनिअर अकाउंटंट या पदावर नेमणूक केलेली आहे, त्यासाठी एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये लागतील व तुला ७३०००/- रुपये पगार मिळेल असे सांगितले. यादरम्यान फिर्यादीने आरोपीस एक लाख एक्काहत्तर हजार रुपये एवढी एकूण रक्कम दिलेली होती व आरोपीने फिर्यादीस रेल्वेमध्ये नोकरी लागल्याबद्दलचे जॉइनिंग लेटर व अग्रीमेंट लेटर दिले. ही कागदपत्रे घेऊन फिर्यादीने रेल्वे विभागात चौकशी केली असता त्यास समजले की, सर्व कागदपत्रे बनावट असुन आपली फसवणूक झालेली आहे. याबाबत फिर्यादीने पांगरी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर आरोपीस पोलिसांनी अटक करून अधिक तपास केला असता आणखी काही तरुणांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातील फसवणुकीची एकूण रक्कम ३३,३९,१२६/- रुपयांपर्यंत पोहोचली.
आरोपी समाधान बालाजी वट्टमवार याने दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयात त्याचे विधीज्ञ यांचेमार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी दरम्यान, या घटनेतील फसवणूक झालेले तरुण यांनी जामीन अर्जावर हरकत घेऊन विधीज्ञांमार्फत न्यायालयात आपले म्हणणे मांडले. हरकतदार यांचे विधीज्ञ आणि सरकारी वकील यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला.
सरकारी पक्षाच्या व हरकतदार यांचे वतीने विधीज्ञांनी न्यायालयासमोर आरोपीच्या कृत्यामुळे हरकतदार प्रसन्न लुंगारे व सौरभ महंकाळे व फिर्यादी यांना झालेला मानसिक, आर्थिक त्रास, आणि साक्षीदारांच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित झालेला धोका यावर जोर दिला. यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. व्ही. के. मांडे यांनी सरकारी वकील आणि हरकतदार यांचे वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला. या प्रकरणात हरकतदारांचे वतीने ॲड. सुहास कांबळे, सरकारी पक्षातर्फे ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.




