कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0

मेळघाटातील रस्त्यासाठी मार्ग काढणार, मदर डेअरीचे दोन दूध संकलन केंद्र सुरू करणार

B1न्यूज मराठी नेटवर्क

अमरावती, दि. 17 : मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. कोठा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यात येत आहेत. येत्या काळात या ठिकाणी पाच कोटी रुपयांच्या कोसा साडी निर्मितीचा उद्योग उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

धारणी तालुक्यातील कोठा येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आज कार्यक्रम पार पडला, यावेळी कांचन गडकरी, संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष डॉ. निरुपमा देशपांडे, योगेश बापट आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांचा विकास व्हावा, समाजात स्थान मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आदिवासींमध्ये कौशल्य असून त्यास प्रशिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे.

संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून बांबूच्या सुबक वस्तू तयार करण्यात येत असून जगभरातील 60 देशांमध्ये या वस्तू पोहोचल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आपल्यापर्यंत चालून आला पाहिजे, अशा वस्तू निर्मिती करण्यावर भर द्यावा. आज विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. याचा उपयोगही करून घेणे आवश्यक आहे. कोशाच्या साडीला जगभरात मागणी असून यासाठी पाच कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येईल.

प्रकल्पासाठी आवश्यक असणारा दोन कोटी रुपयांचा स्वनिधी संस्थेसाठी देणगी देण्यात येणार आहे. तसेच तीन कोटी रुपयांचे केंद्राचे सहकार्य देण्यात येईल. साडी निर्मितीसाठी आवश्यक ते प्रशिक्षणही उपलब्ध करून देण्यात येईल.

मेळघाटातील रस्त्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाण आहे. रस्त्यांच्या विकासाशिवाय या भागाचा विकास शक्य नाही. देशातील महामार्गाचे काम एशियन बँक करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचे काम कशा पद्धतीने करण्यात येईल, याची माहिती घेण्यात येईल. मेळघाटातील युवकांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी दरवर्षी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय होईल. तसेच मदर डेअरीच्या माध्यमातून दूध संकलनासाठी धारणी आणि अन्य एका ठिकाणी केंद्र उभारण्यात येईल. यातून दररोज नगदी पैसे मिळण्यास मदत होईल.

यावेळी गडकरी यांच्या हस्ते कारागीर हाटचे विमोचन करण्यात आले. डॉ. निरूपमा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. योगेश बापट यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गरजू कुटुंबांना गॅस शेगडीचे वितरण करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या