मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकला रामकाल पथाचे भूमिपूजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नाशिक दि. 13 : केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट’ योजनेंतर्गत 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कल्पना नायर, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकाल पथाची माहिती जाणून घेतली. रामकाल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग, रामकाल पथवरील संपूर्ण संरचनांचे संवर्धन, दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. रामकुंड, सीता गुंफा, काळाराम मंदिर, राम लक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रकल्पामुळे भाविकांपर्यंत पोहोचेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकचे सांस्कृतिक महत्व जगभरात पोहोचविण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या साह्याने हा प्रकल्प उभारला जात आहे. देशभरातून गोदातटी येणाऱ्या भाविकांसाठी आनंददायी अनुभव देण्याच्या दृष्टीने आणि या पवित्र स्थळाचे स्थान महात्म्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. रामकाल पथ प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळाराम मंदिराला भेट देत दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या