बालविवाह रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्वाची – जिल्हाधिकारी आशिष येरेकर
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती, दि. 7 : बालविवाह होत असल्यास गावातील नागरिकांन याची माहिती असते. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी प्रामुख्याने मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका आणि लोकप्रतिनिधींनाची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र, आपला संकल्प अभियान’च्या अनुषंगाने बैठक पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महिला व बालविकास उप मुख्य कार्यकारी अधिकारी विलास मसराळे, माविमचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश टेकाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, पोलिस विभागाच्या दिप्ती ब्राम्हणे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येरेकर म्हणाले, जिल्हाधिकारी मुलामुलींचा जन्मदर हा समाधानकारक आहे. मात्र काही भागात बालविवाह होत आहे. त्यामुळे माता आणि बालकांचे चांगले पोषण होत नसल्याने मातामृत्यू आणि बालमृत्यूची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कमी वयात होणारे विवाह रोखणे आवश्यक आहे. यासाठी प्रामुख्याने शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाभरात किशोरी मेळाव्यांसारखे उपक्रम राबविण्यात यावे. मेळघाटात कोरकू बोलीभाषा असल्यामुळे जनजागृतीसाठी त्यांच्याच भाषेचा उपयोग करावा.
शाळेतून मुलींची अनुपस्थिती ही मुख्याध्यापकांना पहिल्यांदा जाणवते. त्यामुळे मुख्याध्यापकांनी अचानक शाळेत मुलींची गैरहजेरी जाणविल्यास याबाबत समितीला माहिती द्यावी. अशा मुलींचे बालविवाह होत असल्यास तातडीने याची माहिती देण्यात यावी. तसेच गावातील ग्रामसेवक, सरपंच यांनाही गावातील विवाहाची माहिती होत असल्याने त्यांच्यावरही जबाबदारी सोपविण्यात यावी. गावात बालविवाह झाल्यास ग्रामसेवकांवर कार्यवाही करावी. बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती ही महत्वाची असल्याने येत्या बालकदिनी बालविवाह रोखण्याची शपथ सर्व शाळांमध्ये घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाबाबत जनजागृती करण्यात यावी. यासाठी कृति आराखडा तयार करण्यात यावा. यात कार्यक्रमाचे नियोजन करून जिल्ह्यात राबविण्यात यावेत. तसेच गावातीलच महिलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले असल्यास अशांचा सत्कार करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी उपस्थितांनी बालविवाह रोखण्याची शपथ घेतली.




