“हार मानायच नाही आर्यन मॅन महावीर कदम यांचा अविस्मरणीय अनुभव

0

“कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती,
लहरों से डरकर नौका पार नहीं होती.”

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : १ नोव्हेंबर २०२५ — हा दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण बनून राहिला.
त्या दिवशी मी मलेशिया लंगकावी येथे झालेल्या Full Ironman Malaysia स्पर्धेत सहभागी झालो होतो.
जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत ३.८ किमी स्विमिंग, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी रनिंग — असे एकूण २२६ किमी अंतर १७ तासांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असते.

मी मागील वर्षी ऑस्ट्रेलियात Ironman ही रेस १३ तास ४१ मिनिटात पूर्ण केली होती परंतु मलेशियातील हवामान आणि परिस्थिती खूपच आव्हानात्मक होती — ४० अंश सेल्सियस तापमान, प्रचंड दमट हवा आणि डोंगराळ सायकलिंग रूट.
या रेससाठी मी सलग मागील एक वर्षांपासून कठोर प्रशिक्षण घेतले होते, आणि माझं ध्येय होतं — ही रेस १४ तासांच्या आगोदर पूर्ण करायची!

🏊‍♂️ स्विमिंगची शानदार सुरुवात

स्पर्धेची सुरुवात छान झाली. मी ३.८ किमी स्विमिंग फक्त १ तास २७ मिनिटांत पूर्ण केली पण बाहेर येताच समजलं — माझं ट्रॅकिंग बंद झालं आहे! आयोजकांशी संपर्क साधताना ३५ मिनिटं वाया गेली. तरीही मनात एकच विचार — “काही हरकत नाही, पुढे चांगलं करू.”

🚴‍♂️ सायकलिंगमधला संघर्ष

सायकलिंग सुरू केल्यावर सुरुवातीलाच मोठं संकट आलं. उंच चढावर सायकलचा गिअर कॉलर पार्ट तुटला आणि मी कोसळलो.
मेकॅनिकने सांगितलं — “सायकल पूर्ण दुरुस्त होणार नाही. रेस सोडावी लागेल.”
क्षणभर मन सुन्न झालं, पण लगेच विचार आला — “इतक्या महिन्यांचं कष्ट एका अपघाताने वाया जाऊ देणार नाही.”
त्यांनी तात्पुरती दुरुस्ती केली आणि सांगितलं की फक्त एका गिअरमध्येच सायकल चालवता येईल.
मी जोखीम स्वीकारली आणि ठरवलं — “आता काहीही झालं तरी रेस पूर्ण करायची!”

⛰️ जिद्दीची सायकलिंग

१८० किमी सायकलिंगमधील घाट, उतार आणि भीषण ऊन — प्रत्येक क्षणी मनात भीती होती की पार्ट पुन्हा तुटेल का?
पण संयमाने, शिस्तीने आणि दृढ इच्छाशक्तीने पुढे जात राहिलो.
आणि शेवटी, निर्धारित वेळेच्या फक्त १० मिनिटे आधी सायकलिंग पूर्ण केली!
काही मिनिटे उशीर झाला असता, तर स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं असतं.

🏃‍♂️ शेवटची लढत — रनिंग

सायकलिंगनंतर ४२.२ किमी रनिंग — तेही दमट आणि उष्ण वातावरणात.
शरीर थकलं होतं, पण मन थांबत नव्हतं.
शेवटच्या काही किमीमध्ये फक्त एकच आवाज आतून येत होता —

“हार मानायची नाही!”

आणि शेवटी, मी १६ तास २८ मिनिटांत Ironman Malaysia पूर्ण केली.
त्या क्षणी झालेला आनंद शब्दात मावणार नाही. कारण हे यश मी “जिंकलेलं नाही”, तर “हातातून गेलेलं यश परत खेचून आणलेलं” होतं.

🌟 जीवनाचा अर्थ

या रेसने मला शिकवलं —
जीवन हे Ironman रेससारखंच असतं.
कधी डोंगर चढावे लागतात, कधी उतारावरून सावरावं लागतं.
कधी काहीच आपल्या हातात नसतं — पण संयम, प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पुढे नेतात.

समस्या सांगून येत नाहीत, आणि त्या एकट्याही येत नाहीत.
पण त्या प्रत्येक वेळी आपल्याला मजबूत बनवतात.

“यश हे शेवट नाही, संघर्ष हा प्रवासाचा खरा गाभा आहे.”

आपला,
🏅 IRONMAN Mahavir Kadam
“हार मानायची नाही – हेच खरे आयुष्याचं सूत्र!”

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या