टोल रद्दची मागणी करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
B1न्यूज मराठी नेटवर्क
कोल्हापूर दि. 3 : पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रलंबित आहे, जी कामे सुरु आहेत ती कामे वेळेत आणि पूर्ण दर्जेदार करावीत. जर रस्त्यांची कामे येत्या 31 जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण व दर्जेदार झाली नाहीत तर पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोलनाके रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन.एस, माजी आमदार संजय घाटगे, राधानगरी प्रांतधिकारी प्रसाद चौगुले,नॅशनल हायवे ऑफ अथॉरिटीचे प्रकल्प संचालक संजय कदम, भैय्या माने प्रामुख्याने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असल्याने सातारा कागल महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाली आहे तसेच सेवा रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत. यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास सुखकारक होईल. गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव हे गाव 100 टक्के सोलरयुक्त करण्यात यावे. यासाठी लागणारे उर्वरित तीन कोटी रुपये सीएसआर मधून जमा करण्यात यावेत. तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे जे गाळेधारक भाडेकरु आहेत त्यांनी भाड्यापोटी मूळ रक्कम अदा करावी. मनपाने त्यांच्याकडून व्याज आकारणी करु नये, अशी सुचनाही त्यांनी केली.
यावेळी मुश्रीफ यांनी मौजे बेलेवाडी मासा येथील महार वतन जमीन संपादन, गडहिंग्लज वडरगे रोड येथे नव्याने विकसित होणारे क्रीडा संकुलाच्या हद्दीतील वृक्षतोड, आंबे – ओहोळ मध्यम प्रकल्प पुनर्वसनबाबत प्रलंबित विषय, पदवीधर मतदार नोंदणीबाबत तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतील भाडेवाढ संदर्भात किरकोळ किराणा दुकानदार/ व्यापाऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने दीर्घ आढावा घेतला.
या आढावा बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, निवडणूक उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी देवानंद ढेकळे, शिवराज नाईकवाडे, वनविभागाचे धैर्यशील पाटील, विलास काळे, सचिन सावंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.




