कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री. विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा संपन्न, नांदेड जिल्ह्यातील रामराव व सौ. सुशिलाबाई वालेगावकर दाम्पत्याला मिळाला शासकीय महापूजेचा मान
B1न्यूज मराठी नेटवर्क
पंढरपूर | २ नोव्हेंबर २०२५ : पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या शुभप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक उपस्थित राहून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. “विठ्ठल नामाचा गजर” करत भक्तिभावाने पार पडलेल्या या महापूजेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
या वेळी उपस्थित भाविकांनी “जय जय विठ्ठला, पांडुरंगा” च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून टाकले. कार्तिकी वारीच्या पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव म्हणून ही महापूजा भाविकांसाठी एक अनोखा अध्यात्मिक अनुभव ठरली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यानिमित्त सर्व राज्यवासियांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रात सर्वत्र शांतता, समृद्धी आणि ऐक्य नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली.




