राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दि.२३ रोजी; ३७ केंद्रांवर २४ हजार ३८५ परीक्षार्थींची व्यवस्था

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि.२८ : महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ रविवार दि.२३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. जिल्ह्यातील २४ हजार ३८५ परीक्षार्थीसाठी दोन सत्रात ३७ केंद्रांवर या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींना पुरेशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्या व परीक्षा केंद्रावर आवश्यक सुरक्षा व अन्य व्यवस्थांची सज्जता ठेवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता सुजाता भालेराव, सहा. पोलीस आयुक्त डॉ. भागिरथी पवार, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ रविवार दि.२३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात ३७ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळचे सत्र सकाळी साडेदहा ते दुपारी १ व दुपारचे सत्र दुपारी अडीच ते सायं.५ अशा दोन सत्रात परीक्षा होणार आहे. सकाळच्या सत्रात ११ हजार १३४ तर दुपारच्या सत्रात १३ हजार २५१ परीक्षार्थी परीक्षा देतील. चार माध्यमांत ही परीक्षा होईल. परीक्षेच्या नियोजनासाठी ९ झोन करण्यात आले आहेत. एकूण ४३ केंद्रसंचालक या परीक्षेचे कार्यान्वयन करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, परीक्षा शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडाव्या. त्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन व्हावे. सुरक्षा, सुविधांची उपलब्धता करण्यात यावी. परीक्षार्थींना प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा पुरेसा व बिनचुक पत्ता द्यावा. परीक्षार्थींची गैरसोय होऊ नये याची पुरेपुर काळजी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या