पीएम किसान अंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये — पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0

दहा दिवसात अभियान स्वरूपात अडचणी दूर करण्याचे निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क

कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील तांत्रिक अडचणींमुळे पात्र लाभार्थी शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन मोडवर विशेष मोहीम हाती घ्यावी. पुढील दहा दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, मंडळ आणि तालुका स्तरावर अभियान राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहसंचालक कृषी बसवराज मास्तोळी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी उपस्थित होते. तर तालुका कृषी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आदी अधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना विविध योजनेतील लाभ मिळण्याच्या प्रक्रियेतील ई-केवायसी, आधार सीडिंग आणि ऍग्रीस्टॅक नोंदणीतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पी एम किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे 82,600 शेतकऱ्यांची ऍग्रीस्टॅक नोंदणी, पी एम किसान मधील 4,134 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया, तसेच 11,538 शेतकऱ्यांची आधार सीडिंग प्रक्रिया प्रलंबित आहे. सद्या जिल्ह्यातील 7 लाख 45 हजार शेतकऱ्यांपैकी 5 लाख 85 हजार शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत. त्यांपैकी सुमारे 5 लाख शेतकऱ्यांना आधीच लाभ मिळत आहे, मात्र 43 हजार पात्र शेतकरी तांत्रिक कारणामुळे पोर्टलवर अपात्र ठरत आहेत.

या पार्श्वभूमीवर पुढील दहा दिवसांपर्यंत तालुका स्तरावर तक्रार निवारण सुविधा केंद्रे स्थापन करून शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही शेतकऱ्याला वेगवेगळ्या कार्यालयांत हेलपाटे मारावे लागू नयेत, त्यांना लाभ मिळेल यासाठी सकारात्मक मदत करा, तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य पोहोचवावे, असेही पालकमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या