सोलापूर महानगरपालिकेत आज दक्षता शपथ घेऊन सप्ताहाची सुरुवात
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभर दरवर्षीप्रमाणे “दक्षता जनजागृती सप्ताह” साजरा केला जात आहे. यावर्षी हा सप्ताह दिनांक 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि जनकेंद्री प्रशासनाची कास धरणे हा या सप्ताहाचा मूलभूत उद्देश आहे.
याच अनुषंगाने आज दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता आणि पारदर्शक प्रशासनाची शपथ घेतली. प्रामाणिक व जबाबदार कार्यप्रणालीने नागरिकांचा विश्वास संपादन करणे, प्रशासनातील भ्रष्टाचारास आळा घालणे आणि न्याय्य सेवाप्रदान हा शपथेचा गाभा होता.
कार्यक्रमास महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रशासनात कार्यरत प्रत्येकाने कर्तव्यनिष्ठ राहून जबाबदारीची जाणीव मनात ठेवणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. भ्रष्टाचार ही विकास प्रक्रियेतील सर्वात मोठी अडथळा असून त्यास आळा घालण्यासाठी दक्षता हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. “नागरिकांचा विश्वास हा प्रशासनाचा मजबूत पाया असून तो जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विणा पवार, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक नगररचना संचालक मनीष भीष्णूरकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त सौ. मनीषा मगर, नगर अभियंता सौ. सारिका आकूलवार यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व विभागीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतत दक्षता, पारदर्शकता आणि शासकीय सेवेत उत्तरदायित्व वाढीस लागावे यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम या सप्ताहात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नागरिकांशी संवाद वाढवून त्यांचे हक्क, तक्रार निवारण प्रणाली आणि सेवाप्रदान प्रक्रियेत पारदर्शकता वाढविण्यावर या कार्यक्रमाचा भर असणार आहे.
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




