बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शीचा पूरग्रस्तांसाठी हातभार!
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पूराने अनेकांचे संसार वाहून गेले, घरं उद्ध्वस्त झाली, हसरे चेहरे दु:खाने भरले… पण या काळोखातही माणुसकीचा दिवा पेटवणारे बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शीचे विद्यार्थी ठरलेत आशेचे दीपस्तंभ.
कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी निःस्वार्थ भावनेने समाजासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा निधी संकलित केला. विद्यार्थ्यांच्या या छोट्याशा प्रयत्नातून रु. ३०२०/- इतकी रक्कम गोळा झाली.
ही मदत प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पूरग्रस्त मदत निधीकडे आर टी जी एस द्वारे सुपूर्त करण्यात आली. त्या क्षणी सर्वांच्या डोळ्यांत समाधानाचे आणि संवेदनांचे अश्रू दाटले — कारण ही मदत रक्कम नव्हे, तर तरुणाईच्या माणुसकीचा संदेश होता.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, IQAC समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. के. बी. चपटे, ग्रंथपाल सौ. ज्योती यादव, प्रा. अक्षय पवार शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. रोहित डिसले, प्रा एन आर सारफळे , प्रा हनुमंत काळे डॉ. अजय पाटील व प्रा एम. पी शिंदे इ. उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी दाखवलेला हा उपक्रम म्हणजे समाजसेवेचा नव्हे, तर हृदयातील करुणेचा खरा अर्थ आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतून असे सामाजिक उपक्रम सतत राबवले जातील.”
विद्यार्थ्यांच्या या कार्यामुळे बार्शी परिसरात कौतुकाचा वर्षाव होत असून, या तरुणांनी ‘आपण सगळेच कोणाच्या तरी आधाराचे कारण होऊ शकतो’ हे समाजाला दाखवून दिले आहे.




