सुसंस्कृत, निर्व्यसनी विद्यार्थ्यांची पिढी तयार करून साधू संतांच्या विचाराचा समाज घडवावाउपमुख्यमंत्री अजित पवार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सातारा : आजचा काळ बदललेला आहे, या बदललेल्या काळानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे शिक्षण घेणे गरजेचे होत आहे. औंधसारख्या सुंदर परिसरात उभारलेल्या नूतन शाळेमधून सुसंस्कृत, निर्व्यसनी विद्यार्थ्यांची पिढी तयार करून साधू संतांच्या विचाराचा समाज घडवावा, यासाठी सर्व शिक्षकांनी व शाळेतील प्रत्येक घटकांनी इच्छाशक्ती दाखवावी, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

औंध येथे औंध शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलाच्या श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, फलटणचे आमदार सचिन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, औंध शिक्षण मंडळाचे चेअरमन व औंध संस्थानच्या अधिपती श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, संस्थेच्या व्हॉइस चेअरमन श्रीमंत चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, संस्थेच्या सदस्या हर्षिताराजे पंतप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

औंध शिक्षण मंडळाच्या संस्थेला एक वेगळी पार्श्वभूमी व वेगळा इतिहास असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ज्यावेळी बहुजन समाजातील गोरगरीब व मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडली नव्हती शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यावेळी श्रीमंत भगवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी शैक्षणिक प्रगती घडवून आणली. या शाळेमध्ये साने गुरुजी, ग. दि.माडगूळकर,शंकरराव खरात, किर्लोस्कर यासारख्या महान व्यक्तींनी शिक्षण घेतले आहे. आता काळ बदललेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारखे आधुनिक प्रकारचे शिक्षण आताच्या पिढीला देण्याची गरज झाली आहे. शाळेच्या शैक्षणिक कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व शिक्षकांनी काम करावे. या शाळेमधून उत्तमातील उत्तम मुले भविष्यात तयार झाली पाहिजे यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे. जगात प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. सातारा जिल्ह्यात औंध, खटावमधील मुलांना एआयचे शिक्षण घेता यावे अडीच एकर परिसरामध्ये दिमाखदार इमारत उभारण्यासाठी सर्वजन मिळून प्रयत्न करू.

औंध येथील वस्तुसंग्रहालयातील विकासाकरिता नुकताच 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचा उत्कृष्ट आराखडा तयार करण्यात येत आहे. देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी, पर्यटक, यमाई देवीचे भाविक भेट देतील असे उत्तम पद्धतीने संग्रहालयाचा विकास करू असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा औंध शिक्षण मंडळाच्या वतीने भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळेच्या मुलांनी सादर केलेल्या स्वागतपर नृत्य, गाणी, भाषण कौशल्य, मल्लखांब प्रात्यक्षिक, पारंपारिक युद्ध कौशल्याच्या खेळांना टाळ्यांनी दाद दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या