शेतकऱ्यांनी खर्च कमी करुन उत्पादन वाढविण्यासाठी एआय विकसित तंत्रज्ञानाचा वापर करावा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
सेलू येथे शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
वर्धा : निसर्ग बेभरवशाचा झाल्यामुळे शेतकरी हवालदील होत आहे. या संकटातून दूर जाण्यासाठी शेतकऱ्यांनी निराश न होता उत्पादन खर्च कमी करुन उत्पादन वाढविण्यासाठी एआय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर व ऑर्गेनिक पध्दतीने शेती केल्यास शून्य खर्च जास्त उत्पादन मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सेलू येथे मानस ॲग्रो इंडस्ट्रीज ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीने माहेर मंगल कार्यालय येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, संजय गाते, सुधीर दिवे, अनिल जोशी, नंदकिशोर खोडे आदी उपस्थित होते.
येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्यासोबत शेतीला पाण्याची मोठी आवश्यकता भासणार असून यासाठी गावातील पाणी गावात, शेतातील पाणी शेतातच आणि शेतातील पाणी जमीनीत अशी जलनिती अंगिकारावी लागेल. बळीराजा सुखी समृद्ध व्हावा यासाठी शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी विविध योजना राबवित आहे. प्रत्येकाने ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करायचे असेल तर तंत्रज्ञान स्विकारले पाहिजे. एआयचा वापर करुन इलेक्ट्रीक ड्रोन, ईलेक्ट्रीक टॅ्रक्टरचा वापर केल्यास शून्य शेती खर्च करण्यास मदत होणार आहे, असे पुढे बोलतांना नितीन गडकरी म्हणाले.
बारामती येथील संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन ऊस लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल. ऊसापासुन इथेनॉल तयार केल्यास वाहनांमध्ये इथेनालच्या वापरातून भारत देश हा एक दिवस इंधन दाता, ऊर्जा दाता होऊन स्वयंपूर्ण होईल. ऊसाच्या चाऱ्यामुळे दुग्ध उत्पादनाला सुध्दा चालना मिळून दुग्ध उत्पादन वाढविण्यात मदत होईल. शेतकऱ्यांनी सोयाबिन, कापूस पिकांवर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीत बदल करावा, असेही आवाहन यावेळी नितीन गडकरी यांनी केले.
नॅनो खते, मिश्रित खते तसेच प-हाटी पासून तयार करण्यात येत असलेल्या ऑर्गेनिक कार्बन व ऑर्गेनिक खताचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास शेती खर्च कमी करता येतो, असेही पुढे बोलतांना श्री. गडकरी म्हणाले.
शेतकऱ्यांनी पिक पध्दतीत बदल करणे गरजेचे – डॉ.पंकज भोयर
जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबिन व कापूस पिकाचे उत्पादन घेत असतांना कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाला त्यांना सामोरे जावे लागते. यासाठी शेतकऱ्यांनी पिक पध्दतीत बदल करण्याची आवश्यक आहे. वर्धा व सेलू तालुका शेतकऱ्यांशी निगडीत असून या भागातील शेतकरी समृध्द व्हावा, त्यांना सिंचनासाठी पाण्याची सुविधा निर्माण व्हावी यासाठी 50 ते 60 वर्ष जून्या असलेल्या धाम व बोर प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी अनुक्रमे 197 कोटी व 210 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली असून लवकरच प्रकल्पाच्या दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात येणार आहे. यामुळे वर्धा व सेलू तालुक्यातील सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांना बारामाही शेताला पाणी मिळून अधिक उत्पादन घेणे सोईचे होईल, असे डॉ. पंकज भोयर म्हणाले.
यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते उच्चांक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर शेतकरी व नागरिक उपस्थित होते.




