ऑरिक सिटी वर्धापन दिन,समृद्धी जोडमार्गाचे उद्योग मंत्री सामंत यांच्या हस्ते लोकर्पण
अभिनव उद्योग धोरणांमुळे राज्य देशात अव्वल-उद्योग मंत्री उदय सामंत
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.२९ : ऑरिक सिटीच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त समृद्धी जोडमार्गाचे लोकार्पण उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्यशासन अभिनव धोरणे राबवित आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र देशात औद्योगिक गुंतवणूकीत अव्वल आहे. छत्रपती संभाजीनगर येथे गुंतवणूकीस उद्योग जगताची पसंती आहे. त्यासाठी येथील उद्योग व संलग्न क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
शेंद्रा येथील ऑरिक सिटी या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीचा ६ वा वर्धापन दिन व समृद्धी महामार्ग ते शेंद्रा औद्योगिक वसाहत जोडमार्गाचे लोकार्पण आज करण्यात आले. या कार्यक्रमास उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,खा. डॉ. भागवत कराड, खा. संदिपान भुमरे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप चे व्यवस्थापकीय संचालक पी.डी. मलिकनेर, सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, भास्कर मुंडे, विजय राठोड, अभिजित राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑरिक सिटी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात उद्योग मंत्री सामंत यांच्या हस्ते बोधचिन्ह, संकेतस्थळ, पोर्टल यांचे अनावरण करण्यात आले. तसेच ऑरिक सिटी च्या सहा वर्षाच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या कॉफी टेबल बुक चे विमोचन करण्यात आले.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, औद्योगिक वसाहत समृद्धी महामार्गाला जोडल्यामुळे वाहतुकीची मोठी सोय झाली आहे, शिवाय शहरातील रहदारीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. याठिकाणी शेंद्रा ते बिडकीन या स्वतंत्र रस्त्याचे काम केल्यास आणखीन सुविधा होणार आहे. उद्योजकांची मागणी पाहता आणखीन भुसंपादन करून जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सावे यांनी केली.
उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, अतिवृष्टी ने बाधित शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. या संकटात शासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. उद्योग जगतानेही या आपल्या संकटात सापडलेल्या भावांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत सहयोग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, ऑरिक सिटीचे यश हे त्यासाठी जमीन देणारे शेतकरी आणि त्यावर उद्योग उभारून गुंतवणूक करणारे उद्योजक या दोघांचे आहे. या वसाहतीचे आणखीन प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. अतिवृष्टीमुळे औद्योगिकक्षेत्रानजिक शेती, गावांना काही समस्या निर्माण झाल्या, त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना नजिकच्या काळात करण्यात येतील. येत्या वर्षभरात आणखीन ५ हजार एकर जागा उपलब्ध करून देऊ. बिडकीन या औद्योगिक वसाहतीनजिक असणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि प्रकल्प बाधितांचे प्रश्न एक महिन्याच्या आत सोडवावे, असे निर्देश त्यांनी दिले.
ऑरिक सिटीचे कामकाज प्रभावी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे जॉब कार्ड तयार करू. आपण स्वतः प्रत्येक महिन्यात एकदा येऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्याने उद्योग क्षेत्रासाठी नवीन १२ धोरणे निश्चित केली आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्रात राज्य देशात क्रमांक १ वर आहे. येत्या वर्षभरात आणखीन ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.




