श्री शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थी संवादातून पूरग्रस्तांच्या व्यथा कविता व निबंधामधून प्रकटल्या
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सध्या पावसाने राज्यभरात थैमान माजविले आहे. पूरपरिस्थितीमुळे राज्याच्याअनेक गावात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविणे व त्यांचे अनुभव ऐकणे यास प्राथमिकता देणे गरजेचे आहे. याच विचारावर आधारित श्री शिवाजी महाविद्यालय अंतर्गत कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत विद्यार्थी संवाद: व्यथा पूरग्रस्तांच्या या विषयावर चर्चासंवाद आयोजित करण्यात आला.
यास अनुसरून विद्यार्थ्यांनी कवितांमधून व निबंध लेखनामधून आपल्या गावातील पूरपरिस्थितीचे वास्तव मांडले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख, स्पर्धा परीक्षा विभाग समन्वयक डॉ. राहुल पालके हे उपस्थित होते. राज्यातील विविध भागातील पूरग्रस्तांचे अनुभव विद्यार्थीमनांनी प्रकट केले. बी.एस्सी. भाग- २ मधील पंकज लांडगे याने महापूर ही कविता सादर करून परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांच्या व्यथा मांडल्या.
प्रिया पाटील हिने पांगरी गावातील पूरबाधित लोकांचे दुःख पूर या कविता व निबंधातून मांडले. वैष्णवी धस हिने पिंपगळगावातील पूरस्थितीचे वास्तव कवितेमधून कथन केले. हर्षवर्धन पाटील याने राज्यभरातील पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे हवालदिल शेतकऱ्यांचे अनुभव कथन केले.
याप्रसंगी डॉ. राहुल पालके यांनी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांचे पावसामुळे झालेले अतोनात नुकसान याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी केकी एन. दारुवाला यांच्या द घाग्रा इन स्पेट या कवितेचा सारांश रूपाने मांडत पूरग्रस्तांचे अनुभव कथन केले. बार्शी तालुक्यातील पूरग्रस्तांचे अनुभव करीत त्यांनी विविधप्रकारे मदतीसाठी आवाहन केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील बी.एस्सी. भाग- २ या वर्गातील विद्यार्थ्यांनी पूरपस्थितीबाबत लेखन व वाच्यता करून सामाजिक जाणीव व एकोप्याचा दाखला दिला.




