आधुनिक काळातील बदलत्या आव्हानांना सामना करण्यासाठी आश्रमशाळेच्या बदलावर भर–उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘मुक्ता-जगन्नाथ पुरस्कार’ वितरण
B1न्यूज मराठी नेटवर्क
बारामती : आधुनिक काळातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्यातील आश्रमशाळांमध्ये राज्य शासनाच्यावतीने आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. त्यामध्ये आधुनिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
पंडिता रमाबाई समाज प्रबोधन संस्था यांच्या विद्यमाने यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा, मुर्टी-मोढवे येथे आयोजित स्वातंत्र्यसैनिक स्व. जगन्नाथ (आण्णा) कोकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२५-२६ या वर्षाचा राज्यस्तरीय ‘मुक्ता-जगन्नाथ पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार ॲड. विजय मोरे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, कार्यकारी अभियंता अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल, पंडिता रमाबाई समाज प्रबोधन संस्थेच्या अध्यक्षा अलका मोरे, मुख्याध्यापक विश्वनाथ टेंगले, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
पंडिता रमाबाई समाज प्रबोधन संस्थेचे सामाजिक योगदान
पवार म्हणाले, पंडिता रमाबाई यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन अलका मोरे यांनी पंडिता रमाबाई समाज प्रबोधन संस्थेची स्थापना केली आहे. सामाजिक, शैक्षणिक, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती व महिलांचे सक्षमीकरण या क्षेत्रांत संस्थेचे भरीव योगदान आहे. ग्रामीण भागातील गरीब, मागासवर्गीय नागरिकांना कायदेविषयक जनजागृती शिबिरे, महिलांसाठी लघुउद्योग प्रशिक्षण, महिला-शेतकरी-शेतमजूर मेळावे तसेच वृक्षलागवडीसारखे अनेक उपक्रम संस्थेच्यावतीने राबविण्यात येतात. या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा आदर्श माता पुरस्कार हीदेखील अत्यंत स्तुत्य बाब आहे.
यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळेत परिसरातील अनाथ, निराधार, इतर मागास बहुजन कल्याण, विमुक्त जाती-भटक्या जमाती व गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दालने खुली करण्यात आली आहेत. शाळेत अत्याधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या शाळेला ‘आदर्श आश्रमशाळा पुरस्कार’ मिळणे अभिमानाची बाब असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा आश्रयस्थान ठरत आहे. या शाळेच्या कामकाजाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे पवार यांनी सांगितले.
स्वातंत्र्यसैनिक स्व. जगन्नाथ (आण्णा) कोकरे यांचे कार्य प्रेरणादायी
स्वातंत्र्यसैनिक स्व. जगन्नाथ (आण्णा) कोकरे यांनी केवळ २० व्या वर्षी तुरुंगवास भोगला होता. स्वातंत्र्यसैनिक समितीवर कार्यरत राहून ते सदैव लोकहितासाठी अग्रेसर होते. त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. यापूर्वी गणपतराव देशमुख, नरेंद्र दाभोळकर, मोहन धारिया, अनिल अवचट, राजू शेट्टी आदी मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांची उंची व महत्त्व यावरून लक्षात येते.
यावर्षी संस्थेने डॉ. संजय सावंत यांची योग्य निवड केली आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी आतापर्यंत १६ गावांमध्ये ‘सुवर्णकन्या अभियान’ राबवले असून १ लाख रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. त्यांच्या या कार्याला उपमुख्यमंत्री पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
बारामतीत कर्करोग रुग्णालय व सायन्स पार्क उभारणार
तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे काम सुरू आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम हाती घेण्यात आले आहे. जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम सुरू आहे. कऱ्हा-नीरा नदीजोड उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
कर्करोग हा गंभीर आजार असून उपचार सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे बारामती येथे १० एकर जागेवर अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे. कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या सायन्स पार्कव्यतिरिक्त शहरात आणखी एक सायन्स पार्क उभारण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना
ॲड. विजय मोरे म्हणाले, स्वातंत्र्यसैनिक स्व. जगन्नाथ (आण्णा) कोकरे यांच्या योगदानाचे स्मरण राहावे यासाठी या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. विज्ञान प्रदर्शनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यास उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. संजय सावंत म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून तालुक्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण होत असून नागरिकांना विविध आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून प्रमाणिकपणे रुग्णसेवा करत असल्याची दखल या पुरस्कारातून मिळाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात यापुढेही अशीच सेवा सुरू राहील, असे ते म्हणाले.




