ओढ्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; २४ तासांत मिळाली तात्काळ शासकीय मदत
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील शेतकरी रामेश्वर केशव शिराळकर (वय ४५) यांचा मालेगाव परिसरातील ओढ्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर प्रशासनाने अतिशय वेगाने कार्यवाही करून केवळ २४ तासांच्या आत मृतकाच्या कुटुंबाला शासकीय मदत मंजूर केली.
मालेगाव येथील ओढ्यात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण माळी यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ तपास सुरू केला. वैराग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ काही तासांत पंचनामा व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. दरम्यान, सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गोपलकर मॅडम यांनी विलंब न करता शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल तयार करून दिल्यामुळे पुढील प्रक्रिया गतीमान झाली.
तत्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी अहोरात्र मेहनत घेऊन मदत अहवाल तयार केला. त्यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्राचे पालकमंत्री जयकुमार गोरे, तुळजापूरचे आमदार राणादादा पाटील तसेच बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सक्रिय पाठिंबा देत मदत निधी मंजूर करून घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला.
या सर्व प्रयत्नांच्या परिणामी शिराळकर कुटुंबीयांना शासनाकडून अपघाती मृत्यूची तात्काळ आर्थिक मदत मिळाली. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या वेगवान कारवाईचे आणि लोकप्रतिनिधींच्या तत्परतेचे कौतुक केले असून, अशा वेळेस शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देणारी ही कार्यशैली आदर्श ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे.




