महसूल पथकाची धडक कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारे वाहने जप्त
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या जिल्हा पथकाने केली कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क
जालना,दि.24 : जालना जिल्ह्यात होणाऱ्या विनापरवाना अवैध वाळू वाहतूकीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नियंत्रण आणण्यासाठी महसूल विभागाचे विशेष जिल्हास्तरीय पथक तयार केले असून या पथकामार्फत जिल्ह्यात विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई करण्यात येत आहे.
भोकरदन तालूक्यात जालना-राजूर रोडवर जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांच्या पथकाने भोकरदन तालूक्यातील राजुर गणपती येथील अनिल रमेश जाधव यांच्या मालकीच्या हायवा मध्ये हायवा वाहन चालक आनंद रावसाहेब खिल्लारे अवैधरित्या वाळू वाहतुक करतांना निदर्शनास आला. यावेळी परवानाबाबत चौकशी केली असता, संबंधीताकडे कोणताही परवाना नसल्याने जिल्हास्तरीय पथकाने सुमारे दोन ब्रास वाळूसह हायवा जप्त केला.
तसेच दूसऱ्या कारवाईत जालना-राजूर रोडवरच जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांच्या पथकाने भोकरदन तालूक्यातील देऊळगाव येथील दिनकर बाजीराव जुंबड यांच्या मालकीच्या हायवा मध्ये हायवा वाहन चालक गणेश सुदाम नाबदे अवैधरित्या सुमारे 5 ब्रास वाळू वाहतुक करतांना निदर्शनास आला. यावेळी वाहनचालकास वाळू वाहतूक परवानाबाबत चौकशी केली असता, संबंधीताकडे कोणताही परवाना नसल्याने जिल्हाधिकारी पथकाने जिल्हाधिकारी आशिमा मितल यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 5 ब्रास वाळूसह हायवा जप्त केला.
जाफ्राबाद तालुक्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी-राजुर रोडवर विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसील कार्यालय जाफराबाद यांच्या महसुल पथकाने जप्त करून टेंभुर्णी येथील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्याची माहिती जाफ्राबाद तहसिलदार सारिका भगत यांनी दिली आहे. यामध्ये पहिल्या प्रकरणात जाफ्राबाद तालूक्यातील खापरखेडा येथील विष्णु गणेश म्हस्के यांच्या मालकीच्या जॉन डियर कंपनी ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना अवैध वाळुने भरलेला तसेच वाहन क्रमांक नसलेला ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतुक करताना वाहन चालक संदिप काशिनाथ इंगळे यांच्यासह महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करुन जप्त केला.
तसेच दूसऱ्या कारवाईत संदीप बाबुराव गोफणे यांच्या मालकीच्या सोनालिका कपंनीच्या ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना अवैध वाळुने भरलेला तसेच वाहन क्रमांक नसलेला ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतुक करताना वाहन चालक संदीप लिंबाजी रोकडे यांच्यासह महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करुन जप्त केला. या महसुल पथकात नायब तहसीलदार चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी बी. जी. ब्राम्हणे, अमोल मुरकुटे, एन. एच. पठाण, माधव साळवे, राजू खांडेभराड यांचा समावेश होता.
जिल्ह्यात अवैध वाळू उपसा किंवा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.




