एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

0

नुकसानग्रस्त भागातील शेतीशिवाराची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी “काळजी करू नका, शासन आपल्या सोबत…

B1न्यूज मराठी नेटवर्क

जालना,दि.24 : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. सोमठाणा, ता.बदनापूर, ढाकलगाव, ता. अंबड या गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन “काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे” असा धीर दिला.

एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जालना जिल्ह्यातील सोमठाणा, ता.बदनापूर व ढाकलगाव, ता. अंबड शिवारात आज सकाळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आमदार नारायण कुचे यांच्यासह महसूल, कृषि, पशुसंवर्धन, कृषि विद्यापीठ यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री भरणे संवाद साधताना म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवाने कष्टाने पिकविलेल्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात नुकसानीचे क्षेत्र अधिक आहे. कपाशी, सोयाबीन यासह इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. पशुधन तसेच घराची पडझड झाली आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांसह तातडीने पंचनामे करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा.

अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे, असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
जालना जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आहे. गेल्या आठ-दहा दिवसात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शेतीशिवारात पिके पाण्याखाली आहेत, तर कुठे पीक वाहून गेल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत तातडीने मदत पोहचलीच पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाने तत्परतेने पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

राज्याच्या कृषिमंत्री म्हणून आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तसेच शासनाची भूमिका शेतकऱ्याला आधार देण्याचीच असून नुकसानीचे पंचनामे होऊन प्रस्ताव सादर होताच मदत तत्परतेने मदत मिळेल, संकटाच्या काळात आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहूयात असेही ते म्हणाले. यावेळी शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या