विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांची सोयाबीन प्रादेशिक अनुसंधान केंद्रास भेट व पाहणी
शेतकरी बांधवांनी संशोधीत सोयाबीन वाणांची माहिती घेण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अधिनस्त असलेल्या अखिल भारतीय समन्वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्प-प्रादेशिक अनुसंधान केंद्रास विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज भेट दिली. या केंद्राव्दारे संशोधन करुन लागवड करण्यात आलेल्या सोयाबीनच्या विविध वाणांची पाहणी व त्याबाबत सविस्तर माहिती विभागीय आयुक्तांनी जाणून घेतली. अमरावती विभागातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी या केंद्राव्दारे संशोधित सोयाबिन वाणांची पाहणी करुन त्याबाबतचे फायदे जाणून घेऊन लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.
यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु शरद गडाख, पीकेव्हीचे संचालक (संशोधन) डॉ. श्यामसुंदर माने, संचालक (शिक्षण व विस्तार) डॉ. धनराज उंदिरवाडे, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, यवतमाळचे एसएओ संतोष डाबरे, अकोल्याचे एसएओ शंकर किरवे, प्रादेशिक अनुसंधान केंद्राचे प्रमुख डॉ. सतीश निचळ, कृषी उपसंचालक वरुण देशमुख यांच्यासह अनुसंधान केंद्राचे अधिकारी व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याव्दारे विद्यापीठ परिसरात दि. 20, 21 व 22 सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांसाठी पिकांची लागवड पध्दती, शेती विषयक महत्वाच्या बाबी या विषयांवर कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे कृषी विभागाच्या समाजमाध्यमांव्दारे सर्वीकडे प्रसारण होणार आहे, याचा शेतकरी बंधु- भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरु गडाख यांनी याप्रसंगी केले.
अमरावती प्रादेशिक संशोधन केंद्र हे अखिल भारतीय समन्वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्पाचे मुख्य संशोधन केंद्र असून या केंद्राव्दारे सोयाबीनचे सहा वाण व 36 संशोधनात्मक शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केलेल्या आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकरी बंधु भगिनींना सोयाबीनचे विविध वाण प्रत्यक्ष पाहता यावेत. या वाणांचे गुणधर्म व वैशिष्ट्ये समजून घेऊन त्यामधून आपल्यासाठी वाण निवडता यावा, याकरिता या केंद्रावर व्हेरायटल कॅफेटेरिया लावण्यात आला असून यामध्ये मध्य व दक्षिण विभागाकरिता शिफारशीत एकूण 44 वाणांची लागवड करण्यात आलेली आहे, अशी माहिती अनुसंधान केंद्राचे प्रमुख डॉ. निचळ यांनी यावेळी उपस्थितांना दिली.




