सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्याची मागणी
बार्शी तालुक्यातील गौडगाव, वैराग, खांडवी, नारी आणि पांगरी मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, मे, जून जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली होती. आधीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने हवालदीक झालेला शेतकरी आता अतिवृष्टी पावसामुळे सोयाबीन पिकात मोठया प्रमाणात पाणी साचल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
सोयाबीन पीक कसेबसे येण्याच्या मार्गावर असतानाच अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास पावसाने फिरवल्यामुळे बार्शी तालुक्यातील गौडगाव, वैराग, खांडवी, नारी आणि पांगरी मंडळातील शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे.
तहसीलदार यांनी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे, त्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी राहुल भड, विनायक घोडके, विक्रम भराटे, नामदेव ठाकरे, पांडूरंग घोलप आदी शेतकऱ्यांनी तहसीलदार एफ.आर. शेख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.




