कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच यशाचे रहस्य – जिल्हाधिकारी किशन जावळे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड, दि.१ : आपल्याला कर्मयोगी व्हायचे असल्यास सतत शिकत राहणे आवश्यक आहे. कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच यशाचे रहस्य आहे. शासकीय कामकाजातील नोटिंग, टिपणी, फायलिंग यांसारख्या मूलभूत बाबी प्रत्येक कर्मचाऱ्याने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सेवाविषयक बाबींच्या पुर्तता मेळाव्याचे आयोजन जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, नगर पालिका प्रशासन अधिकारी विराज लबडे, सह-जिल्हा निबंधक श्रीकांत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, अनुकंपा भरतीसंदर्भात शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत जुने ४५ जीआर रद्द करून नवे धोरण लागू केले असून, त्या धोरणानुसार जिल्ह्यातील ग्रामविकास, नगरविकास, पोलीस तसेच इतर सर्व शासकीय विभागांतील प्रलंबित उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त उमेदवारांनी जनसेवेची ही संधी मनापासून आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षमतेने पार पाडावी. तसेच काही कर्मचाऱ्यांना कालबाह्यबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला असून, सर्व विभागांनी हा लाभ जानेवारी महिन्यात देण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील १ हजार ३९० कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके डिजिटायझेशन झाली असून त्यांना सेवार्थ क्रमांक जोडण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

कोतवाल आणि पोलीस पाटील या संवर्गातील प्रलंबित भरती प्रक्रियेत अडचणी दूर होऊन आता नियुक्ती सुलभ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. सर्व विभागांनी वर्षातून किमान दोन वेळा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या विषयांचे प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश दिले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सेवा विषयक बाबींच्या अनुषंगाने पात्र लाभार्थीना अनुकंपा नियुक्ती, पदोन्नती शिपाई संवर्ग, आश्वासित प्रगती लाभ योजना (पहिला, दुसरा, तिसरा )नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या