बार्शी तिथं सरशी अमोल देबडवार राज्यात पहिले, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकपदी निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आले तुफान जरी, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी… या गाण्याच्या ओळी सत्यात उतरवत बार्शीतील अमोल देबडवार यांनी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकपदाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र राज्य आदिवासी विभागातर्फे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अमोल देबडवार EWS प्रवर्गातून राज्यात प्रथम आले आहेत. बार्शी तिथं सरशी ही म्हण त्यांनी खरी करून दाखवली.
महाराष्ट्र राज्य आदिवासी विभागातर्फे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी एप्रिल 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये, बार्शीचे अमोल देबडवार EWS प्रवर्गातून राज्यात पहिले आले. तर, सर्वसाधारण प्रवर्गात राज्यात 5 वे स्थान त्यांनी पटकवले आहे. देबडवार हे सध्या मुंबईतील भाषा संचालनालयात कार्यरत आहेत. या निवडीबद्दल मित्र, नातेवाईक आणि विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
अमोल यांचे शालेय शिक्षण न्यू हायस्कुल प्रशालेत झाले असून 11वी, 12 वी महाराष्ट्र विद्यालय, त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथून त्यांनी पदवी तर पुणे विद्यापीठातून MA पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे SET, NET (History) दोन्ही परीक्षा त्यांनी पास केल्या आहेत. या शिवाय मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी आपली LLB पदवी देखील प्राप्त केली आहे. उच्चविद्याविभूषित असलेल्या देबडवार यांनी UPSC परीक्षेतही सातत्याने प्रयत्न केले. मात्र, अवघ्या काही गुणांनी त्यांना अपयश आले. मात्र, शासकीय सेवेतील नोकरीची जिद्द ना सोडता, सततच्या प्रयत्नातून त्यांनी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदावर नियुक्ती मिळवली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. तर, EWS प्रवर्गातून राज्यात प्रथम येत त्यांनी बार्शी तिथं सरशी हे ब्रीद सत्यात उतरवलं आहे.




