विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज शहर पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. 26 एमएलडी पाणी देण्याबाबतचे नियोजन विभागाने पूर्ण केले आहे. 1 ऑगस्टपासून पाणी पुरवठा करण्याबाबतची चाचणी सुरू करण्यात येणार आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर तातडीने नियमित पाणी पुरवठा करणार असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महानगर पालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, नगर पालिका प्रशासन सहआयुक्त देवीदास टेकाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील यांच्यासह यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त पापळकर यांनी जायकवाडी धरणातील उद्भव विहिर (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र फारोळा, ॲप्रोच ब्रिज अशुद्ध जलवाहिनी, शुद्ध जलवाहिनी, पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी जो कालावधी निश्चित करण्यात आला आहे त्या कालमर्यादेत काम पूर्ण करा, कोणत्याही परिस्थितीत आलेल्या अडचणींवर तात्काळ मार्ग काढून कामात विलंब होणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.




