बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..!

0

विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन…!

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई, दि. २८ : महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरून ग्रँण्ड मास्टर दिव्या देशमुख यांनी भारताची मान गौरवाने उंचावली आहे. विशेषतः महाराष्ट्राची पहिली ग्रँण्ड मास्टर..विश्वविजेती म्हणून महाराष्ट्राचे नाव बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरही सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे. या कामगिरीसाठी तमाम महाराष्ट्राच्यावतीने दिव्या देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुख यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी उपविजेत्या ग्रँण्ड मास्टर कोनेरू हम्पी यांचेही अभिनंदन केले आहे.

बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरील या दोन्ही भारतीय खेळाडूंच्या चालींकडे अवघ्या बुद्धिबळ जगताची नजर खिळली होती, हा देखील भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी अपूर्व आणि अभिमानास्पद योग असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस शुभेच्छा संदेशात म्हणतात, महिला विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्याच प्रयत्नात दिव्या यांनी भारतीय विक्रम नोंदवला आहे. महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या किशोरवयीन बुद्धिबळपटू ठरल्या आहेत. यासोबतच आता त्या भारताची चौथ्या महिला ग्रँडमास्टर ठरल्या आहेत.

आतापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर ४० वेळा भारताचे प्रतिनिधीत्व करत, ३५ वेळा पदक पटकाविले आहे. यात तब्बल २३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ ब्राँन्झ पदकांचा समावेश आहे. बुद्धिबळाच्या विश्वविजेते पदासाठी दोन भारतीय बुद्धिबळपटूंची लक्षवेधी झुंज जगासाठीही उत्कंठावर्धक ठरली, हे देखील विशेष मानावे लागेल. बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळाडूंनी घेतलेली झेप महत्वाचीच अशी आहे.

दिव्या आणि कोनेरू यांच्या पटावरील चाली या तोडीस तोड होत्या. या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचला आहे. यातून भारताला आणखी एक ग्रँण्डमास्टर बुद्धिबळपटू मिळाली आहे. तीही महाराष्ट्रातून हे विशेष. या दोघींचे यश हे भारतातल्या उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणादायी ठरणार आहे. हे यश भारताच्या क्रीडा लौकीकात भर घालणारे आहे. या यशासाठी दिव्या आणि कोनेरु यांचे मनापासून अभिनंदन. ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांची विश्वविजेती कामगिरी म्हणजे महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी असा क्षण आहे.

या विश्वविजयी कामगिरीसाठी ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांचे मनापासून अभिनंदन. त्यांच्या सातत्यपूर्ण यशासाठी मेहनत घेणाऱे प्रशिक्षक – मार्गदर्शक तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आई-वडील व देशमुख परिवारातील सर्वांचे मनापासून अभिनंदन..ग्रँण्डमास्टर दिव्या यांच्याकडून यापुढे कॅँण्डिडेटस् स्पर्धेतही असाच विजय साकारला जाईल असा विश्वास आहे. त्याकरिता त्यांना खूप खूप शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या