आदिवासी विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड : आदिवासी समाजातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असून या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित आदिवासी विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्स पाटील, प्रकल्प संचालक, आदिवासी विभाग पेण आत्माराम धाबे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, रायगड विजय कुलकर्णी आदीसह इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके आढावा घेणार आहेत. याकरिता प्रत्येक विभागाने आपली कामे पूर्ण करावीत. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM JANMAN)] धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान, वनहक्क दावे व इतर योजना याबाबत काही प्रलंबित कामे असतील तर ती कामे पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी उपस्थित सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.




