विशेष मध्यस्थी मोहिमेंतर्गत विभक्त होण्याच्या मार्गावरील जोडप्यांची पुन्हा जुळली रेशीमगाठ
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या
B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात विशेष मध्यस्थी मोहिम दि.1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत मध्यस्थी कक्ष सस्थापन करण्यात आले असून कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कक्षात प्रशिक्षित मध्यस्थ अधिवक्त्यांकडून दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकल्या जातात. सदर प्रशिक्षित मध्यस्थी अधिवक्त्याकडून याबाबतचा फायदा व तोटा काय आहे हे दोघांनाही समजावून सांगितल्या जातात. कक्षाच्या मदतीने विभक्त होण्याच्या मार्गावर असलेल्या जोडप्यांची पुन्हा रेशीमगाठ जुळविण्यात आली आहे.
दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, यवतमाळ यांच्याकडील प्रकरणातील एक जोडपे विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर असतांना त्यांच्यामध्ये प्रशिक्षित मध्यस्थांनी मध्यस्थीद्वारे चर्चा करुन त्यांच्यात समझोता घडवून आणला. या जोडप्याने भविष्याचा विचार करुन पुन्हा सुखाने नांदण्याचा निर्णय घेवून त्यांच्या रेशीमगाठी पुन्हा जुळल्याने त्यांचा परिवार व मुले आनंदी झाले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्याकडून सदर जोडप्याला भेटवस्तु देवून त्यांना पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्याहस्ते सदर जोडप्याला रोपटे देवून पुढील भविष्याकरीता शुभेच्छा देण्यात आल्या. जोडप्यामध्ये मध्यस्थी घडवून आणल्याबद्दल प्रशिक्षीत मध्यस्थ चेतन गांधी यांना रोपटे देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव दिपक दाभाडे उपस्थित होते.




