गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम – तहसीलदार शेख
वीरशैव विद्यासंवर्धनी मंडळाच्या वतीने ७० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ४० कुटुंबांना जातीचे पुरावे वितरीत
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : वीरशैव विद्यासंवर्धनी मंडळ, बार्शी यांच्या वतीने शहर व तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिष्यवृत्ती वितरण आणि लिंगायत समाजातील जाती व पोटजात प्रमाणपत्राच्या पुराव्यांचे वितरण असा भव्य कार्यक्रम लिंगायत बोर्डिंग येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित तहसीलदार एफ.आर. शेख यांनी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे ही केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या पाठीवरची शाबासकी असल्याचे सांगून,“ही मदत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल,” असे उद्गार काढले.
कार्यक्रमाला अध्यक्ष बाबासाहेब मनगिरे मुख्यधिकारी बाळासाहेब चव्हाण, रावसाहेब मनगिरे, बाबासाहेब कथले, नागेश अक्कलकोटे, विलास रेणके, प्रशांत कथले गिरीष बरिदे, पिंटु माळगे, अण्णा पेठकर, अशोक मठपती, ॲड. सचिन शेटे, विवेक देवणे, प्रभुलिंग स्वामी यांच्यासह लिंगायत समाजातील नागरिक, महिला भगिनी, विविध पक्षांचे पदाधिकारी व समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार शेख यांनी यावेळी सांगितले की, “बार्शी तालुका व शहरातील लिंगायत समाजाचा सामाजिक आणि प्रशासकीय दृष्टिकोन प्रगल्भ असून, मंडळाच्या पुढाकारातून जुने मोडी लिपीतील अभिलेख शोधून जातीचे पुरावे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. प्रत्येक गावातील जुने सातबारे, फेरफार, जन्म-मृत्यू दाखले आणि मोडी भाषेतील अभिलेखांचा अभ्यास करून मिळणारे पुरावे हे समाजातील वंचित घटकांसाठी उपयुक्त ठरत आहेत.”
मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले की, “बार्शी नगरपरिषदेच्या वतीने राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘कुणबी जात प्रमाणपत्र’ शोधण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली असून, १८६५ पासूनचे स्कॅन केलेले जुने जन्म-मृत्यू रेकॉर्ड वापरून आतापर्यंत ६०० हून अधिक नोंदी शोधण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत १८७७ सालातील सर्वात जुनी नोंदही सापडली आहे. नगरपालिका कर्मचारी योगेश घंटे यांचे या कामात महत्त्वाचे योगदान राहिले आहे.”
चव्हाण पुढे म्हणाले की, “ही मोहीम केवळ जातीचे दाखले देण्यासाठी नव्हे, तर समाजातील दुर्बल घटकांना OBC अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मोडी लिपीतील अभिलेखांचे भाषांतर करून, वंशावळीनुसार अर्जदारांना योग्य कागदपत्रे पुरवली जात आहेत.”
कार्यक्रमात रावसाहेब मनगिरे यांनी सांगितले की, “जात प्रमाणपत्र ही शैक्षणिक आणि शासकीय पातळीवर अत्यावश्यक बाब आहे. मात्र, सर्वसामान्यांना OBC सर्टिफिकेटसाठी लागणारे पुरावे मिळवताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे मंडळाने जातीचे पुरावे शोधण्याची मोहीम सुरू केली असून, याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होणार आहे.” त्यांनी मुख्याधिकारी चव्हाण आणि योगेश घंटे यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
शिष्यवृत्तीचे वाटप :
प्रतीक किशोर भागवत, ऋषिकेश उमेश नागणसूरकर, आकांक्षा दत्तात्रय वायकर, सृष्टी दिलीप कुणके, सायली संतोष कानडे आदी ७० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली.
जातीचे पुरावे वाटप :
गंगाधर उंबरदंड, गुरुदत्त कावळे, सुहास पुरवंत, कौशल्या खंबाळे, गोपाळ शाहीर, शिवम कुंकुकरी, अमित वायचळ यांच्यासह ४० लाभार्थ्यांना जातीचे पुरावे तहसीलदार शेख व मुख्याधिकारी चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.




