लाडकी बहिण योजनेचे अर्ज स्विकारणे बंद
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्याने सोलापूर जिल्ह्यात योजनेचे नारीशक्ती पोर्टल बंद करण्यात आले आहे. ऑक्टोबरपासून नव्या नोंदणीचे अर्ज स्वीकारणेही थांबवण्यात आले आहे. योजनेच्या खर्चामुळे इतर विभागांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यात सुमारे ११ लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला, परंतु अनेक महिलांचे अर्ज वयोमर्यादा (६५ वर्षांपेक्षा जास्त), चुकीचा आधार क्रमांक, एका कुटुंबातून दोनपेक्षा जास्त लाभार्थी, तसेच संजय गांधी किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमुळे बाद झाले. जिल्हा पातळीवर बाद अर्जांची नेमकी संख्या उपलब्ध नाही, कारण यंत्रणा राज्य पातळीवरून कार्यरत आहे. काही महिलांनी स्वत:हून योजनेचा लाभ सोडला, विशेषत: ज्या आधीपासून इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी सांगितले की, लाभ बंद झालेल्या महिलांना डेटा तपासून कारणांची माहिती दिली जाते. शासन आता हा आर्थिक ताण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे.




