देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
B1न्यूज मराठी नेटवर्क
कोल्हापूर, दि. 17 : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकासित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करुन त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतक-यांशी प्रत्यक्ष चर्चा करुन तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थांना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26 ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सह संचालक बसवराज मास्तोळी यांनी आवाहन केले आहे.
सन 2025-26 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे खालीलप्रमाणे देशांत गटनिहाय देशाबाहेर अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात येत आहे.
युरोप, नेदरलॅंड, जर्मनी, स्वित्झलँड, फ्रान्स- 12 दिवस- फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन इ. इस्त्राईल- 9 दिवस- आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व कृषी यांत्रिकीकरण जपान- 10 दिवस- सेंद्रिय शेती व आधुनिक कृषी तंत्रज्ञान मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाईन्स- 12 दिवस- फळे व भाजीपाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन प्रणाली चीन- 8 दिवस- विविध कृषी तंत्रज्ञान पिक उत्पादकता वाढवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी EXPO दक्षिण कोरिया- 8 दिवस- आधुनिक कृषी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान
परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकरी निवड करण्याची पद्धत-
अभ्यास दौऱ्यासाठी प्रती जिल्हा एकूण 5 याप्रमाणे विभागातून 15 शेतकरी यांची प्रत्येक जिल्हास्तरावर सोडतीद्वारा निवड करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज हे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करावयाचे आहेत. उपलब्ध सर्व अर्जांची जिल्हा स्तरावर सोडत केली जाणार असुन त्यामधून अंतिम पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या पाच पैकी नऊ महिला शेतकरी, एक केंद्र अथवा राज्य पुरस्कार प्रात्प व पिक स्पर्धा विजेता शेतकरी आणि इतर तीन शेतकरी अशी निवड करण्यात येईल.
लाभार्थी अनुदान- शासनाकडून अभ्यास दौऱ्यारिता सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रक्कम रु. 1 लाख (अक्षरी रुपये एक लाख फक्त) अनुदान म्हणून देय राहील. निवड झालेल्या लाभार्थींनी अनुदानाची रक्कम वगळून उर्वरित रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरावयाची आहे.
परदेश अभ्यास दौऱ्याकरिता शेतकरी पात्रता निकष-
अभ्यास दौ-याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. स्वतःच्या नावे चालू कालावधीचा (मागील सहा महिन्यातील) 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-2) शेतकऱ्याचे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने स्वखचर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब या व्याख्येमध्ये पती, पत्नी व त्यांची 18 वर्षांखालील मुले-मुली) शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही परंतु शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे.
यासाठी या योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे. कोरोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषी आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग 7-10 दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारिरीकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे बंधनकारक राहील.
शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा, पुराव्यासाठी पारपत्राची मुदत, वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरोक्स प्रत जोडावी. पारपत्राची वैध मुदत दौरा निघताना किमान तीन महिन्यापेक्षा जास्त असावी. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकाटंट), अभियंता, कंत्राटदार इ. नसावा. तसे त्याने स्वत: स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-2) शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. तसे त्याने स्वत: स्वयंघोषणापत्रात नमूद करावे, (प्रपत्र-2) शेतकरी निवडीबाबत अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव असतील.
या योजनेस लागणारे अर्ज व इतर प्रपत्रे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. शेतक-यांनी 31 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in पहावे, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.




