जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला आरोग्य विभागाच्या योजनांचा आढावा
सन 2030 पर्यंत सांगली – मिरज आरोग्य पंढरी बनविण्याचे नियोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सांगली, दि. 14 : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियामक मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडील विविध कल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी सन 2030 पर्यंत मिरज व सांगली जिल्ह्याचे आरोग्य पंढरी म्हणून व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे, अशा सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, उपमुख्य कार्यकारी (महिला व बालकल्याण) सोमनाथ रसाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. विवेक पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया पाटील, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विनायक पाटील, जिल्हा लेखा व्यवस्थापक उज्ज्वला मोट्रे यांची उपस्थिती होती.
या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा आणि आरोग्य सेवा यांचा आढावा घेण्यात आला.
घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियान महात्मा गांधी जयंतीपर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, अवयवदानाबाबत ग्रामीण स्तरावर व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. नेत्रदान चळवळ उभारुन गरजूंना लाभ देण्याचे द्यावा. एचआयव्ही बाधितांचा वधूवर सूचक मेळावा आठवडा-भरात आयोजित करावा. गरोदर मातांसाठी यशोदा माता अंगत पंगत उपक्रम राबवावा. शालेय विद्यार्थ्यांना दर सोमवारी शाळेमध्ये रक्तवाढीसाठी लोहयुक्त गोळ्या आरोग्य कर्मचारी व शिक्षक यांच्या देखरेखीखाली द्याव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच, अमली पदार्थ व नशामुक्त सांगली साठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. या आढावा सभेसाठी सर्व कार्यक्रम अधिकारी व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




