केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा – खा. श्रीरंग बारणे
B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड दि. 14 — केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.यामध्ये कोणताही हजगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे व सहअध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
रायगड जिल्ह्यातील केंद्रीय योजनांच्या प्रगती आढावा घेण्यासाठी सोमवारी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीची बैठक नियोजन समिती सभागृहात पार पडली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे तर सह अध्यक्षस्थानी खा. सुनील तटकरे हे होते. बैठकीला खा. धैर्यशील पाटील, आ महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे,अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. या प्रकरणी दोषी असणाऱ्या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात यावी तसेच आवश्यकते नुसार फेर निविदा करण्यात यावी असे निर्देश खा श्री तटकरे यांनी यावेळी दिले. तसेच ही सर्व कामे प्राधान्य क्रमाने पूर्ण करावीत.
सर्व सामान्यांना पाणीपुरवठा,आवास, शिक्षण, आरोग्य, त्याचप्रमाणे इतर सुविधाही विविध योजनांच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन प्रयत्नशील आहे. सर्व विभाग, यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे असे खा बारणे यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या सर्व योजनांची जिल्ह्यात प्रभावी प्रसिद्धी करण्यात यावी. मोक्याच्या व प्रत्यक्ष लाभाच्या ठिकाणी ठळक पणे योजना माहिती व लाभार्थी निकष लावावेत अशा सूचनाही बारणे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.




