यवतमाळ शहराकरीता एकात्मिक टपाल वितरण केंद्राचे उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहर व लगतच्या क्षेत्राकरीता एकात्मिक टपाल वितरण केंद्राचे उद्घाटन नागपूर विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांच्या हस्ते यवतमाळ मुख्य टपाल कार्यालय येथे करण्यात आले.
संपुर्ण यवतमाळ शहर व शहरालगतच्या वडगाव, लोहारा, भोसा, करळगाव या परिसरातील नागरिकांना त्यांच्या नावे येणारी टपाल सुव्यवस्थित व जलद वितरित व्हावी याकरीता या संपुर्ण क्षेत्राकरीता एकाच जागेवरून वितरण व्हावे व नागरिकांना संपर्क साधण्याकरीता सोयीचे व्हावे म्हणून यवतमाळ प्रधान डाकघर येथे एकात्मिक टपाल वितरण केंद्र आजपासून सुरु झाले आहे.
यावेळी शोभा मधाळे यांनी हिरवी झेंडी दाखवुन सर्व पोस्टमनला एकत्रितरीत्या टपाल वितरणाकरीता रवाना केले. यामध्ये सर्व पोस्टमन आपल्या उपलब्ध वाहनाद्वारे टपाल वितरण करतील आणि त्यांना याकरिता वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर झालेल्या दराप्रमाणे इंधन भत्ता दिल्या जाईल. पर्यावरण संरक्षणाचा हेतू समोर ठेवून ई-वाहनला प्रोत्साहन देण्यात येईल, असे सांगतांनाच ई-वाहन असणाऱ्या दोन पोस्टमनचे कौतुक सुद्धा करण्यात आले.
बदलत्या काळानुसार टपाल वितरण प्रक्रियेचे आधुनिकीकरण करतांना ही प्रक्रिया पोस्टमनच्या मोबाईल मधील विशेष ॲपद्वारे डिजीटल होईल व आपण पाठविलेल्या टपालाच्या वितरणाची संपुर्ण माहिती डिजीटल माध्यमाद्वारे सुनिश्चित होईल, अशी माहितीही यावेळी शोभा मधाळे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टपाल विभागाचे अधिक्षक मोहन निकम यांनी केले.
कार्यक्रमाचे संचलन टपाल विमा विकास अधिकारी संजय मून यांनी केले तर आभार मुख्यालयातील सहाय्यक टपाल अधिक्षक विश्वेश मानकरयांनी मानले. कार्यक्रमास दक्षिण उपविभाग यवतमाळचे टपाल निरीक्षक कपिल घाटगे, उपविभाग वणीचे टपाल निरीक्षक अशोक मुंडे, यवतमाळ मुख्य टपाल कार्यालयातील पोस्टमास्टर किशोर निनावे तसेच कर्मचारी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




