बार्शी – कुर्डूवाडी रोडवर अज्ञात व्यक्तीकडून कारला आग, ११ लाखांचे नुकसान
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दि. ५ जुलै २०२५ बार्शी शहरातील कुर्डूवाडी रोडवरील दत्त गॅरेज जवळ शुक्रवारी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या सुझुकी इर्टिगा कारला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत कार मालक शंकर आत्मराम लाखे यांचे अंदाजे ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शंकर आत्मराम लाखे (वय ४०, रा. कुर्डवाडी रोड, दत्त गॅरेजजवळ, बार्शी) यांच्या मालकीची सुजुकी इर्टिगा (क्रमांकMH 13 EK8091) ही कार त्यांच्या घराजवळ पार्क केलेली होती. ५ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री १२:१५ वाजण्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणास्तव या कारला आग लावली. आगीमुळे कारच्या पुढील बाजूसह आतील आणि बाहेरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेत कारमालकाचे सुमारे ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लाखे यांनी याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३२६ (F) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, पोलीस नाईक पायघन (पोना/७३९) यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.




